किडणी प्रत्यारोपण ही चिकित्सा विज्ञानाने केलेल्या प्रगतीची खूण आहे. क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या शेवटच्या अवस्थेतल्या उपचारांना हा उत्तम पर्याय आहे. यशस्वी किडणी प्रत्यारोपणानंतर रोग्यांचे आयुष्य इतर व्यक्तींप्रमाणेच निरोगी आणि सामान्य होते.
किडणी प्रत्यारोपण ह्या विषयाची चर्चा आपण चार भागांत करणार आहोत.
१) किडणी प्रत्यारोपणापूर्वी जाणून घ्यायच्या गोष्टी.
२) किडणी प्रत्यारोपण ऑपरेशनबद्दलची माहिती.
३) किडणी प्रत्यारोपणानंतर जाणून घ्यायची आवश्यक माहिती.
४) कॅडेव्हर किडणी प्रत्यारोपण.
किडणी प्रत्यारोपणापूर्वी जाणून घ्यायच्या गोष्टी.
किडणी प्रत्यारोपण म्हणजे काय?
क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रोग्यांत अन्य व्यक्तीची (जिवंत वा मृत) एक निरोगी किडणी ऑपरेशनद्वारे बसवायला किडणी प्रत्यारोपण म्हणतात.
किडणी प्रत्यारोपणाची गरज केव्हा नसते?
कोणत्याही व्यक्तीच्या दोन किडण्यांमधील एक किडणी खराब झाली, तर शरीरातील किडणीशी संबंधित सर्व जरुरी कामे दुसऱ्या किडणीच्या मदतीने होऊ शकतात. तसेच अक्युट किडणी फेल्युअरमध्ये योग्य उपचारांनी (औषधे आणि काही रोग्यांच्या बाबतीत थोड्या काळासाठी केलेल्या डायलिसिसने) किडणी पुन्हा पूर्णपणे काम करू लागते. अशा रोग्यांना किडणी प्रत्यारोपणाची गरज भासत नाही.
किडणी प्रत्यारोपणाचा शोध हा क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रोग्यांसाठी एक वरदानच आहे.
                         
                    
                       
                            
                            किडणी प्रत्यारोपणाची गरज केंव्हा भासते?
क्रॉनिक किडणी फेल्युअर झालेल्या रोग्यांच्या दोन्ही किडण्या जेव्हा ८५ टक्क्यांहून जास्त खराब होतात आणि औषधे घेऊनदेखील रोग्यांची तब्बेत सुधारत नाही आणि त्याला नियमित डायलिसिसची गरज भासते, अशा रोग्यांसाठी किडणी प्रत्यारोपण हा उपचाराचा दुसरा पर्याय ठरू शकतो.
किडणी प्रत्यारोपण का गरजेचे आहे?
क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रोग्यांच्या जेव्हा दोन्ही किडण्या पूर्णपणे खराब होतात तेव्हा, त्याला तब्बेत चांगली ठेवण्यासाठी आठवड्यात तीन वेळा नियमित डायलिसिस आणि औषधे घेण्याची गरज असते. अशा प्रकारच्या रोग्यांची तब्बेत ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी केल्या जाणाऱ्या डायलिसिसवर अवलंबून असते. किडणी प्रत्यारोपणानंतर रोग्याची या सर्वांपासून सुटका होते. यशस्वी किडणी प्रत्यारोपण हा उत्तम रीतीने जगण्याचा एकमेव संपूर्ण आणि परिणामकारक उपाय आहे.
किडणी प्रत्यारोपणापासून कोणते फायदे होतात?
यशस्वी किडणी प्रत्यारोपणाचे फायदे:
१)	रोगी इतर सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे आयुष्य जगू शकतो आणि आपली रोजची कामेदेखील करू शकतो.
२)	डायलिसिस करण्याच्या कटकटीतून रोगी मुक्त होतो.
३)	खाण्यातले पथ्य कमी होते.
४)	रोगी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहतो.
क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या अंतिम अवस्थेतील उपचारांचा यशस्वी किडणी प्रत्यारोपण उत्तम पर्याय आहे.
                         
                    
                       
                            
                            ५)	पुरुषांना शारीरिक संबंध ठेवण्यात कोणतीही अडचण येत नाही आणि महिला रोगी मुलांना जन्मही देऊ शकतात.
६)	सुरुवातीच्या पहिल्या वर्षीच्या उपचारांच्या खर्चानंतर पुढील उपचार कमी खर्चात होतात.
किडणी प्रत्यारोपणाचे तोटे कोणते?
किडणी प्रत्यारोपणामुळे होणारे तोटे पुढीलप्रमाणे आहेत:
१)	मोठ्या आपरेशनची गरज असते, पण ते पूर्ण सुरक्षित असते.
२)	सुरुवातीला यश मिळाल्यानंतरही काही रोग्यांत नंतर किडणी पुन्हा खराब होण्याची शक्यता असते.
३)	किडणी प्रत्यारोपणानंतर नियमित औषधे घेण्याची गरज असते.
४)	सुरुवातीची औषधे खूप महागडी असतात. जर औषधे घेणे थोड्या काळासाठीही बंद झाले, तर प्रत्यारोपित किडणी निकामी होऊ शकते.
५)	हे उपचार खूप महागडे असतात. ऑपरेशन आणि हॉस्पिटलचा खर्च, घरी गेल्यानंतर नियमित औषधे तसेच वारंवार प्रयोगशाळेतील तपासण्या करणें ह्यांचा खर्च खूप (तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत) होतो.
किडणी प्रत्यारोपण करू नये, असा सल्ला केंव्हा दिला जातो?
रोग्याचे वय जास्त असणे, रोगी एड्स किंवा कॅन्सर ने पीडित असणे अशा स्थितीत किडणी प्रत्यारोपण जरुरी असूनही ते केले जात नाही. भारतात मुलांच्यातले किडणी प्रत्यारोपण खूप कमी होताना दिसून येते.
एड्स, कॅन्सरसारखे गंभीर रोग असतील तर किडणी प्रत्यारोपण केले जात नाही.
                         
                    
                       
                            
                            किडणी प्रत्यारोपणासाठी दाता कसा निवडला जातो?
क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रोग्यासाठी कुठल्याही व्यक्तीची किडणी उपयोगी पडेल असे नसते. सगळ्यात प्रथम ज्याला किडणीची गरज आहे त्या रोग्याचा रक्तगट लक्षात घेऊन डॉक्टर हे निश्चित करतात, की कुठली व्यक्ती त्याला किडणी देऊ शकेल.
किडणी देणारा आणि घेणारा ह्यांचे रक्तगट जुळण्याबरोबरच दोघांच्या रक्तातील पांढऱ्या रक्तपेशींमधील एच. एल. ए. (Human Leucocytes Antigen H.L.A.) चे प्रमाणही जुळावे लागते. एच.एल.ए. चे जुळणे हे टिशु टायपिंग नावाच्या तपासणीने पाहिले जातो.
किडणी कोण देऊ शकतो?
सर्वसाधारणपणे १८ ते ५५ वयोगटातील दात्याची किडणी घेता येते. स्त्री आणि पुरुष दोघेही एकमेकांना किडणी देऊ शकतात. जुळे भाऊ-बहीण हे आदर्श किडणीदाते मानले जातात. पण असे सहजासहजी आढळून येत नाही. आई-वडील, भाऊ-बहीण सर्वसाधारणपणे किडणी दान करण्यासाठी निवडले जातात. जर ह्या किडणी दात्यांकडून किडणी मिळू शकली नाही, तर इतर कुटुंबीय जसे, काका, मामा, आत्या, मावशी ह्यांची किडणी घेता येते. जर हेही शक्य नसेल तर पती-पत्नींची एकमेकांच्या किडणीची तपासणी केली पाहिजे. विकसित देशांमध्ये, कुटुंबातल्या व्यक्तीची किडणी मिळाली नाही तर ब्रेनडेड (मेंदू मृत झालेल्या) व्यक्तीच्या किडणीचे (कॅडेव्हर किडणी) प्रत्यारोपण केले जाते.
यशस्वी किडणी प्रत्यारोपणासाठी कुटुंबातील व्यक्तींकडून मिळालेली किडणी सर्वात उत्तम असते.
                         
                    
                       
                            
                            किडणीदात्याला किडणी दान केल्यानंतर कोणता त्रास होऊ शकतो?
किडणी दान करण्यापूर्वी किडणीदात्याची संपूर्ण शारीरक तपासणी केली जाते. दात्याच्या किडण्या योग्य रीतीने कार्यरत आहेत की नाही आणि त्याला एक किडणी दान केल्यानंतर काही त्रास तर होणार नाहीना, हे पूर्णपणे पडताळून पाहिले जाते. साधारणपणे एक किडणी दिल्यानंतर दात्याला कोणताही त्रास होत नाही. तो आपले जीवन पूर्वीप्रमाणेच व्यतीत करू शकतो. ऑपरेशननंतर पूर्ण आराम केल्यानंतर तो शारीरिक श्रमदेखील करू शकतो. त्याच्या वैवाहिक जीवनातही कोणत्याही अडचणी येत नाहीत. दात्याने एक किडणी दिल्यानंतर त्याची दुसरी किडणी दोन्ही किडण्यांचे कार्य सांभाळते.

                         
                    
                       
                            
                            किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेपूर्वी रोग्याची तपासणी
किडणी प्रत्यारोपणाच्या ऑपरेशनपूर्वी रोग्याची अनेक प्रकारे तपासणी केली जाते. ऑपरेशनदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रुग्णाचे शरीर ऑपरेशनसाठी अनुकूल आहे किंवा नाही या हेतूने या तपासण्या करण्यात येतात. त्यात शारीरिक चिकित्सा, लॅबोरेटरी तसेच रेडिओलॉजिकल तपास केला जातो.
किडणी प्रत्यारोपणाच्या ऑपरेशनबद्दलची माहिती
किडणी प्रत्यारोपणाच्या ऑपरेशनमध्ये काय केले जाते?
    - रक्तगट जुळल्यानंतर, एचएलएचे प्रमाण योग्य आहे की नाही हे निश्चित केल्यानंतर किडणी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन केले जाते.
 
    - ऑपरेशनपूर्वी रोग्याचे नातेवाईक आणि किडणीदात्याचे नातेवाईक ह्यांची संमती घेतली जाते.
 
    - किडणी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन डॉक्टरांची एक टीम करते. नेफ्रॉलॉजिस्ट (किडणी फिजीशिअन), युरोलॉजिस्ट (किडणीचे सर्जन), पॅथॉलॉजिस्ट आणि इतर प्रशिक्षित सहाय्यकांच्या संयुक्त कामगिरीने हे ऑपरेशन होते. हे ऑपरेशन युरोलॉजिस्ट करतो.
 
    - किडणीदाता तसेच किडणी मिळणारा रोगी ह्या दोघांचे ऑपरेशन एकाच वेळी केले जाते.
 
    - किडणीदात्याची एक किडणी ऑपरेशन करून काढल्यानंतर ती विशेष प्रकारच्या थंड द्रावात, पूर्णपणे साफ केली जाते. त्यानंतर ही किडणी क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रोग्याच्या पोटाच्या पुढील भागात उजव्या, खालच्या बाजूला प्रत्यारोपित केली जाते.
 
    - सर्वसाधारणपणे रोग्याची खराब किडणी काढली जात नाही. मात्र ही खराब झालेली किडणी शरीराला हानी पोहोचवत असेल तर अशा अपवादात्मक बाबीत किडणी काढणे गरजेचे ठरते.
 
    - हे ऑपरेशन साधारणपणे तीन-चार तास चालते.
 
ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर किडणी प्रत्यारोपण केलेल्या रोग्याच्या पुढील सर्व उपचारांची जबाबदारी नेफ्रॉलॉजिस्ट संभाळतो.
किडणी प्रत्यारोपणात जुनी किडणी आहे त्या स्थितीत ठेवत नवी किडणी पोटाच्या पुढील भागात खालच्या बाजूला बसवली जाते.
                         
                    
                       
                            
                            किडणी प्रत्यारोपणापूर्वी जाणून घ्यायच्या सूचना
संभावित धोका:
    - किडणी प्रत्यारोपणानंतरच्या संभावित धोक्यांमध्ये, शरीराने नवी किडणी न स्वीकारणे (किडणी रीजेक्शन). संसर्ग होणे, ऑपरेशनसंबंधी धोक्यांबाबत भीती वाटणे आणि औषधांचा दुष्परिणाम होणें यांचा समावेश आहे.
 
औषधाद्वारे उपचार आणि किडणी नाकारणे (रिजेक्शन):
किडणी प्रत्यारोपण इतर ऑपरेशन्सपेक्षा कशा प्रकारे वेगळे असते?
    - सामान्यपणे इतर ऑपरेशनंतर रोग्याला फक्त सात ते दहा दिवसांपर्यंत नेमून दिलेली औषधे घ्यायला लागतात. परंतु किडणी प्रत्यारोपणाच्या ऑपरेशननंतर किडणी अस्वीकार थांबवण्यासाठी जन्मभर औषधे घ्यावीच लागतात.
 
किडणी नाकारणे म्हणजे काय?
    - रोग्याच्या रक्तातील पांढऱ्या रक्तपेशींमध्ये रोगप्रतिकारक पदार्थ (अँटीबॉडीज) तयार होतात. ह्या अँटीबॉडीज जीवाणूंशी लढा देऊन त्यांना नष्ट करतात. ह्याच प्रकारे प्रत्यारोपित केलेली किडणी शरीराबाहेरील (परकी) असल्यामुळे, शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींत तयार झालेल्या अँटीबॉडीज प्रत्यारोपित किडणीचे नुकसान करू शकतात. ह्या नुकसानाच्या प्रमाणानुसार नवी किडणी खराब होते. ह्यालाच वैद्यकीय भाषेत किडणी रिजेक्शन म्हणजेच किडणी नाकारणे म्हणतात.
 
किडणी प्रत्यारोपणानंतर चे मुख्य धोके किडणी रीजेक्शन, जंतुसंसर्ग आणि औषधांचा दुष्परिणाम हे आहेत.
                         
                    
                       
                            
                            किडणी प्रत्यारोपणानंतर रिजेक्शनची शक्यता कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारची औषधे उपयोगी ठरू शकतात?
    - शरीराच्या प्रतिकारशक्तीमुळे प्रत्यारोपित किडणी अस्वीकृत होण्याची शक्यता असते.
 
    - जर औषधांनी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी केली तर अस्वीकृतीची भीती राहत नाही, पण रोग्याला जीवघेणा जंतुसंसर्ग होण्याची भीती असते.
 
    - किडणी प्रत्यारोपणानंतर विशिष्ट प्रकारची औषधे दिली जातात, जी किडणी अस्वीकृती थांबवण्याचे मुख्य काम करतात आणि रोग्याची; रोगांशी लढण्याची ताकद कायम ठेवतात (Selective Immuno Suppression).
 
    - अशा प्रकारच्या औषधांना इम्युनो सप्रेसंट म्हटले जाते. प्रेडनीसोलोन, एजाथायोप्रीन, सायक्लोस्पोरिन, ट्राक्रोलिमस आणि एमएमएफ ही अशी मुख्य औषधे आहेत.
 
किडणी प्रत्यारोपणानंतर इम्युनो सप्रेसंट औषधे किती काळ घ्यावी लागतात?
ही खूप महागडी औषधे प्रत्यारोपणानंतर रोग्याला जन्मभर घ्यावी लागतात. सुरुवातीला औषधाचे प्रमाण (खर्चही) जास्त वाटतो पण तो हळूहळू कमी होत जातो.
किडणी प्रत्यारोपणानंतर आणखी काही औषधे घेण्याची गरज असते का?
होय. किडणी प्रत्यारोपण केल्यानंतर गरजेनुसार रोग्याला उच्च रक्तदाबावरील औषधे, कॅल्शिअम, जीवनसत्व आदी औषधे घ्यावी लागतात.
जर इतर कुठल्याही आजारामुळे औषध घेण्याची गरज पडली तर, नव्या डॉक्टरला, औषध घेण्यापूर्वी, रोग्याचे किडणी प्रत्यारोपण झाले आहे तसेच सध्या तो कोणती औषधे घेत आहे हे सांगणे गरजेचे आहे.
अस्वीकृती थांबवण्यासाठी किडणी प्रत्यारोपणानंतर जन्मभर औषधे घेणे आवश्यक असते.
                         
                    
                       
                            
                            किडणी प्रत्यारोपणानंतरच्या आवश्यक सूचना
नव्या किडणीच्या देखभालीसाठी महत्त्वपूर्ण सूचना:
किडणी प्रत्यारोपित केलेल्या रोग्यासाठी, पुढील सुचना महत्त्वपूर्ण आहेत.
    - डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधे घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर औषधे नियमित घेतली नाहीत तर नवी किडणी खराब होण्याचा धोका असतो.
 
    - सुरुवातीला रोग्याचा रक्तदाब, लघवीचे प्रमाण आणि वजन नियमितपणे मोजून त्याची नोंद करणे गरजेचे असते.
 
    - रक्त व लघवीची तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे लॅबोरेटरीत जाऊन केली पाहिजे. व नियमितपणे नेफ्रोलॉजिस्ट कडे तपासणी करुन घेतली पाहीजे रक्त व लघवीचा तपास हा विश्वासपात्र लॅबोरेटरीतूनच करणे जरुरीचे असते. रिपोर्टमध्ये जर मोठे बदल दिसून आले तर लॅब बदलण्याऐवजी नेफ्रॉलॉजिस्टला त्वरित कळवले पाहिजे.
 
    - ताप येणे, पोट दुखणे, कमी लघवी होणे, अचानक वजन वाढणे किंवा इतर काही त्रास होत असेल, तर नेफ्रॉलॉजिस्टशी त्वरित संपर्क साधणे अत्यावश्यक आहे.
 
किडणी प्रत्यारोपण यशस्वी होण्यासाठी, ऑपरेशननंतर आवश्यक ती खबरदारी आणि नियमितपणा पाळणे गरजेचे असते.
                         
                    
                       
                            
                            किडणी प्रत्यारोपणानंतर जंतुसंसर्गापासून वाचण्यासाठी सूचना:
    - सुरुवातीला संसर्ग होऊ नये म्हणून स्वच्छ, जीवाणूरहित मास्क घालणे गरजेचे आहे, जो रोज बदलला पाहिजे.
 
    - रोज स्वच्छ पाण्याने आंघोळ केल्यानंतर उन्हात वाळवलेले आणि इस्त्री केलेले कपडे वापरले पाहिजेत.
 
    - घर पूर्णपणे स्वच्छ ठेवले पाहिजे.
 
    - आजारी व्यक्तीजवळ जाता कामा नये. प्रदूषित, गर्दीच्या ठिकाणी म्हणजे जत्रेत वगैरे जाणे टाळले पाहिजे.
 
    - पाणी नेहमी उकळून, थंड करून, गाळून प्यायले पाहिजे.
 
    - बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत.
 
    - घरात ताजे बनवलेले जेवण स्वच्छ भांड्यात घेऊनच खावे.
 
    - खाण्यापिण्यासंबंधी सर्व सूचनांचे पूर्णपणे पालन करावे.
 
किडणी प्रत्यारोपणाचे कमी प्रमाण:
क्रॉनिक किडणी फेल्युअरचे सर्वच रोगी कोणत्या कारणांमुळे किडणी प्रत्यारोपण करू शकत नाहीत?
किडणी प्रत्यारोपण हा एक परिणामकारक आणि फायदेशीर उपचार आहे. तरीही अनेक रोगी ह्या उपचाराचा फायदा घेऊ शकत नाहीत. ह्याची दोन मुख्य कारणे आहेत.
१) किडणी उपलब्ध न होणे
किडणी बदलू इच्छिणाऱ्या सर्वच रुग्णांना प्रत्यारोपणासाठी कुटुंबातील व्यक्तींची किंवा अन्य कोणाचीही किडणी उपलब्ध न होणे.
किडणी प्रत्यारोपणानंतर जंतुसंसर्ग टाळण्यासाठी सर्वतोपरी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
                         
                    
                       
                            
                            २) महागडे उपचार
सध्याच्या काळात किडणी प्रत्यारोपणासाठी ऑपरेशन, तपासण्या, औषधे, हॉस्पिटलचा खर्च हे सर्व मिळून जवळपास २ ते ५ लाखांपेक्षा जास्त खर्च होतो. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर औषधे आणि तपासण्या करण्याचा खर्चही खूप असतो. पहिल्या वर्षी हा खर्च दरमहा १० ते १५ हजार रुपयांपर्यंत जातो. पहिल्या वर्षांनंतर हा खर्च कमी होऊ लागतो. मात्र जन्मभर औषधे घ्यावीच लागतात. अशाप्रकारे किडणी प्रत्यारोपण ऑपरेशन आणि त्यापुढील औषधांचा खर्च हृदयरोगात केल्या जाणाऱ्या बायपास सर्जरीहूनही महागडा असतो. ह्या महागड्या खर्चामुळेच अनेक रोगी किडणी प्रत्यारोपण करू शकत नाही.
कॅडेव्हर किडणी प्रत्यारोपण
(Cadaver Kidney Transplantation)
कॅडेव्हर किडणी प्रत्यारोपण म्हणजे काय?
ब्रेन डेथ म्हणजे मेंदू मृत (Brain death) झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून निरोगी किडणी काढून ती किडणी फेल्युअर झालेल्या रोग्याच्या शरीरात लावताना केल्या जाणाऱ्या ऑपरेशनला 'कॅडेव्हर किडणी प्रत्यारोपण' म्हणतात.
कॅडव्हर किडणी प्रत्यारोपणाची गरज काय?
कुठल्याही व्यक्तीच्या दोन्ही किडण्या जेव्हा निकामी होतात, तेव्हा उपचारासाठी केवळ दोनच पर्याय असतात, डायलिसिस आणि किडणी प्रत्यारोपण.
सर्वसाधारणपणे किडणी उपलब्ध न होणे आणि जास्त खर्च ही किडणी प्रत्यारोपण मोठ्या प्रमाणावर न होण्याची कारणे आहेत.
                         
                    
                       
                            
                            किडणी प्रत्यारोपण यशस्वी झाल्यानंतर रोग्याला कमी पथ्य पाळणे तसेच सर्वसामान्य तन्हेने जीवन जगण्याची संधी मिळते. यामुळे किडणी फेल्युअरच्या रोग्यांना चांगले जीवन जगता येते.
किडणी प्रत्यारोपणासाठी इच्छुक असलेल्या सर्वच रोग्यांना आपल्या कुटुंबियांकडून किडणी मिळते असे नाही. त्यामुळे डायलिसिसचा मार्ग स्वीकारणाऱ्या रोग्यांची संख्या खूप मोठी आहे. अशा रोग्यांसाठी कॅडेव्हर किडणी प्रत्यारोपण ही एकमेव आशा असते.
मृत्यूनंतर शरीराबरोबरच किडणीही नष्ट होते. जर अशा किडणीच्या मदतीने क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या एखाद्या रोग्याला नवजीवन मिळत असेल तर ह्यापेक्षा अधिक चांगले काय असू शकेल?
मृत मेंदू (ब्रेन डेथ Brain Death) म्हणजे काय?
सोप्या भाषेत मृत्यूचा अर्थ हृदय, श्वास आणि मेंदू कायमचे बंद होणे हा आहे. ब्रेन डेथ अर्थात मेंदूचा मृत्यू हे डॉक्टरांनी करायचे निदान आहे.
ब्रेन डेथच्या रोग्यात गंभीर नुकसान झाल्यामुळे मेंदू कार्य करणे कायमचे बंद करतो. अशा प्रकारच्या रोग्यास, कोणत्याही प्रकारच्या इलाजामुळे रोग्याच्या बेशुद्धावस्थेत कोणतीही सुधारणा होत नाही. व्हेंटीलेटर आणि जीवरक्षक प्रणालीमुळे श्वास आणि हृदयाचे ठोके सुरू असतात. आणि संपूर्ण शरीरात योग्य प्रमाणात रक्तही पोहचत असते. अशा प्रकारच्या मेंदूच्या मृत्यूला ब्रेनडेथ (मेंदूचा मृत्यू) म्हटले जाते.
'ब्रेन डेथ' आणि बेशुद्ध होणे ह्यात काय फरक असतो?
बेशुद्ध झालेल्या रोग्याच्या मेंदूला झालेले नुकसान योग्य उपचारांनी सुधारण्यात येते. अशा प्रकारच्या रोग्यांमध्ये सर्वसाधारणपणे व्हेंटिलेटरशिवाय हृदयाचे ठोके आणि श्वास सुरू असतो. तसेच मेंदूची इतर कार्ये ठीक असतात. अशा प्रकारचा रोगी योग्य उपचारानंतर पुन्हा शुद्धीवर येतो.
किडणी प्रत्यारोपणासाठी कुटुंबियांकडून किडणी न मिळाल्यास कॅडेव्हर किडणी प्रत्यारोपण हा एकमेव आशेचा किरण असतो.
                         
                    
                       
                            
                            ब्रेनडेथमध्ये मात्र मेंदूचे सुधारण्यापलीकडचे असे गंभीर नुकसान होते. अशा प्रकारच्या रोग्यांमध्ये जीवरक्षक प्रणाली बंद करताच श्वास आणि हृदयाचे ठोके थांबतात आणि रोगी मृत्यू पावतो.
कोणतीही व्यक्ती मृत्यूनंतर किडणी दान करू शकते का?
नाही, मृत्यूनंतर नेत्रदानाप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला किडणी दान करता येत नाही. हृदयाची गती थांबल्याबरोबरच किडणीत रक्त पोहोचणे थांबते आणि किडणी काम करणे बंद करते. त्यामुळे साधारणपणे मृत्यूनंतर किडणीचा उपयोग होत नाही.
ब्रेन डेथची मुख्य कारणे काय?
साधारणपणे पुढील कारणांमुळे 'ब्रेन डेथ' होते.
    - अपघातामुळे डोक्याला जबरदस्त जखम होणे.
 
    - रक्तदाब वाढल्यामुळे किंवा रक्तवाहिनी फुटल्यामुळे मेंदूत रक्तस्त्राव होणे.
 
    - मेंदूला रक्त पोहोचवणाऱ्या नलिकेत गुठळी होणे, ज्यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा बंद होतो.
 
    - मेंदूत कॅन्सरची गाठ होणे, ज्यामुळे मेंदूचे गंभीर नुकसान होते.
 
ब्रेन डेथचे निदान केव्हा, कोण आणि कशाप्रकारे करतो?
जोपर्यंत तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे पुरेशा काळापर्यंत जीवरक्षक उपचार करून ही रोग्याचा मेंदू कोणतेही कार्य करत नसेल आणि पूर्णपणे बेशुद्ध असलेल्या रोग्यावर व्हेंटीलेटरद्वारे उपचार चालू असतील, तर रोग्याची ब्रेनडेथ होण्याबाबत चाचणी केली जाते.
ब्रेन डेथ झाल्यानंतर रुग्णाच्या मेंदूची स्थिती सुधारणे अशक्य असते.
                         
                    
                       
                            
                            किडणी प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमपेक्षा पूर्णपणे वेगळ्या डॉक्टरांद्वारा ब्रेन डेथचे निदान केले जाते. ह्या डॉक्टरांमध्ये रोग्यावर उपचार करणाऱ्यांमध्ये फिजिशिअन, न्युरोफिजिशिअन तसेच न्युरोसर्जन आदींचा समावेश असतो.
आवश्यक डॉक्टरी तपासणी, लॅबोरेटरी तपासणीचे सगळे रिपोर्ट, इ.इ.जी. ही मेंदूची खास तपासणी आणि इतर आवश्यक तपासण्यांच्या मदतीने रोग्याच्या मेंदूत सुधारणा होईल का? ह्याबाबतची प्रत्येक शक्यता पडताळून पाहिली जाते. सर्व आवश्यक तपासण्यांनंतर डॉक्टर जेव्हा ह्या निष्कर्षांवर पोहोचतात की रोग्याचा मेंदू पुन्हा कधीही कार्य करू शकणार नाही, तेव्हाच ब्रेन डेथचे निदान करून त्याची घोषणा केली जाते.
किडणी देणाऱ्याला कोणते रोग असतील तर कॅडेव्हर किडणी घेता येत नाही?
    - जर संभाव्य किडणी दात्याच्या रक्तात जंतुसंसर्ग असेल.
 
    - कॅन्सरचा आजार असेल (मेंदूशिवाय इतरत्र).
 
    - किडणी कार्यरत नसेल किंवा बराच काळ किडणी कमी काम करत असेल किंवा किडणीचे काही गंभीर आजार असतील.
 
    - रक्ततपासणीत एड्स किंवा काविळीचे निदान झाले असेल तसेच रोगी दीर्घकाळ मधुमेह किंवा उच्च रक्तदाब पीडित असेल.
 
    - वय १० वर्षांपेक्षा कमी किंवा ७० वर्षांहून अधिक असेल तर अशा स्थितीत किडणी घेतली जाऊ शकत नाही.
 
सोप्या भाषेत ब्रेन डेथचा अर्थ व्हेंटिलेटरच्या मदतीने मृत शरीरात श्वास, हृदय आणि रक्तप्रवाह चालू ठेवणे आहे.
                         
                    
                       
                            
                            कॅडेव्हर दाता कोणकोणते अवयव दान करून इतर रोग्यांना जीवदान देऊ शकतो?
कॅडेव्हर दात्याच्या दोन्ही किडण्या दान देता येतात, ज्यामुळे किडणी फेल्युअरच्या दोन रोग्यांना नवजीवन मिळू शकते.
किडणीव्यतिरिक्त कॅडेव्हर दाता हृदय, लिव्हर, पित्ताशय, डोळे ह्यांसारखे अन्य अवयवही दान करू शकतो.
कॅडेव्हर किडणी प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेत कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश असतो?
कॅडेव्हर किडणीचे प्रत्यारोपण यशस्वी होण्यासाठी सांघिक कार्याची गरज असते. ज्यात:
    - कॅडेव्हर किडणी दान करण्यासाठी मंजुरी देणारे किडणीदात्याचे कुटुंबीय.
 
    - रोग्यांवर उपचार करणारे फिजिशियन.
 
    - कॅडेव्हर प्रत्यारोपणाविषयी प्रेरणा आणि माहिती देणारा प्रत्यारोपण समन्वयक.
 
    - ब्रेन डेथचे निदान करणारे न्युरॉलॉजिस्ट.
 
    - किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या नेफ्रॉलॉजिस्ट तसेच युरॉलॉजिस्ट वगैरेंचा समवेश असतो.
 
एका कॅडेव्हरपासून मिळालेल्या दोन किडण्यांचे दान, दोन रोग्यांना जीवनदान देऊ शकते.
                         
                    
                       
                            
                            कॅडेव्हर प्रत्यारोपण कशाप्रकारे केले जाते?
कॅडेव्हर प्रत्यारोपण करण्याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती पुढील प्रमाणे:
१) ब्रेनडेथचे योग्य निदान व्हायला हवे.
२) किडणी दात्याची लॅबोरेटरी तपासणी आणि त्याची किडणी पूर्ण निरोगी आहे याची योग्य रीतीने पुष्टी.
३) किडणीदानासाठी किडणीदात्याच्या कुटुंबियांची संमती घेतली पाहिजे.
४) किडणीदात्याच्या शरीरातून किडणी बाहेर काढण्याचे ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत व्हेंटिलेटर आणि अन्य उपचारांच्या मदतीने रोग्याचे हृदय आणि श्वास सुरू ठेवले जाते आणि रक्तदाबाचे योग्य प्रमाणही राखले जाते.
५) शरीरातून किडणी बाहेर काढल्यानंतर ती विशेष प्रकारच्या थंड द्रवाने आतून स्वच्छ केली जाते आणि ती योग्य रीतीने बर्फात ठेवली जाते.
६) किडणी दात्याचा रक्तगट आणि पेशींबाबतचा रिपोर्ट लक्षात घेऊन, कॅडेव्हर प्रत्यारोपण करू इच्छिणाऱ्या कुठल्या रोग्यासाठी ही कॅडेव्हर किडणी अधिक योग्य ठरेल हे ठरवणे गरजेचे असते.
७) सर्व प्रकारच्या तपासण्या आणि योग्य तयारीनंतर किडणी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन जेवढ्या लवकर होईल तेवढे अधिक फायदेशीर असते.
८) ऑपरेशन करून काढलेली कॅडेव्हर किडणी किंवा कुटुंबातल्या व्यक्तीकडून मिळालेली किडणी ह्या दोन्ही बाबतींत प्रत्यारोपणाची प्रक्रिया सारखीच असते.
९) एका दात्याच्या शरीरातून दोन किडण्या मिळतात, ज्यामुळे एकाच वेळी दोन रोग्यांवर कॅडेव्हर किडणी प्रत्यारोपण करता येते.
किडणी प्रत्यारोपणानंतर रोगी सर्वसामान्य आयुष्य जगून, सर्व कामे करू शकतो.
                         
                    
                       
                            
                            १०) प्रत्यारोपणापूर्वी बर्फात ठेवलेली किडणी थंड होते आणि रक्त न मिळाल्याने किडणीला पोषण आणि प्राणवायूही मिळत नाही.
११) अशा प्रकारे किडणीच्या झालेल्या नुकसानीमुळे, कॅडेव्हर किडणी प्रत्यारोपण झाल्यानंतर, नवी किडणी कार्यरत व्हायला थोडा वेळ लागू शकतो आणि दरम्यान अशा स्थितीत डायलिसिस करण्याची आवश्यकता देखील पडू शकते.
कॅडेव्हर किडणी दान करणाऱ्यांना काय फायदा मिळतो?
कॅडेव्हर किडणीदात्याच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकाराने पैसे मिळत नाहीत. अशा प्रकारची किडणी घेणाऱ्या रोग्याला कोणतीही किंमत चुकती करायला लागत नाही. मृत्यूनंतर किडणी नष्ट होणारच आहे, त्यापेक्षा गरजू रोग्याला किडणी मिळाली तर नवजीवन मिळते. हे सर्वात अमूल्य दान आहे. अशा दानामुळे एका पीडित आणि दुःखी रोग्याला मदत करून जो आनंद आणि संतोष मिळतो त्याची किंमत कोणत्याही आर्थिक लाभापेक्षा अनेकपट जास्त असते.
अशा प्रकारे कोणी व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर काहीही न गमावता दुसऱ्या रोग्याला नवजीवन देत असेल, तर ह्यापेक्षा आणखी मोठा लाभ तो कोणता?
कॅडेव्हर किडणी प्रत्यारोपणाची सोय कोणकोणत्या ठिकाणी उपलब्ध आहे?
राज्य आणि केंद्र सरकारने अनुमती दिलेल्या रुग्णालयातच कॅडेव्हर किडणी प्रत्यारोपणाची सोय असू शकते. भारतातल्या मुंबई, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, बंगलोर, हैदराबाद आदी ठिकाणी ही सोय उपलब्ध आहे.
मृत्यूनंतर अवयव दान करून दुसऱ्या व्यक्तीला नवजीवन देण्यासारखे दुसरे कोणतेही पुण्यकर्म नाही.