सर्वसाधारणपणे प्रौढ व्यक्तींचा रक्तदाब १३०/८० असतो. जेव्हा रक्तदाब १४०/९० पेक्षा जास्त होतो, तेव्हा त्याला उच्च रक्तदाब किंवा 'हाय ब्लडप्रेशर' म्हणतात.
कोणत्या कारणांनी रक्तदाब वाढतो आणि त्यावर उपचार करणे का गरजेचे असते?
- ३५ वर्षाहून अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये जास्त करून उच्च रक्तदाब आढळतो. अशा प्रकारच्या उच्च रक्तदाबाच्या बहुमतांशी रुग्णांमध्ये हा अनुवंशिक कारणांमुळे आलेला असतो. ज्याला Primary किंवा Essential Hypertension म्हणतात.
- उच्च रक्तदाब असलेल्या रोग्यांपैकी १०% रोग्यात उच्च रक्तदाबाला अनेक रोग कारणीभूत असतात ज्याला Secondary Hypertension म्हणतात.
- उच्च रक्तदाबावर योग्य वेळी उपचार करण्याने हृदय, मेंदू, किडणीसारख्या महत्त्वपूर्ण भागांचे नुकसान टाळता येऊ शकते.
कुठल्या रोगांमुळे रक्तदाबात वाढ होते? (Secondary Hypertension) आणि त्याची कारणे काय आहेत?
उच्च रक्तदाब असलेल्या रोग्यांपैकी केवळ १०% रोग्यांमध्ये रक्तदाबातील वाढीला कुठलातरी रोग कारणीभूत असतो. त्याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे. या कारणांपैकी ९०% रोग्यात आढळणारे महत्त्वपूर्ण कारण किडणीचे रोग असतात.
१) किडणीचे रोग
२) किडणीत रक्त पोहोचवणारी मुख्य नलिका आक्रसली असेल (रेनल आर्टरी स्टेनोसिस)
३) किडणीमधील अॅड्रिनल नावाच्या ग्रंथीत गाठ होणे (Pheochromocytoma)
४) शरीराच्या खालच्या हिश्श्यात रक्तपुरवठा करणारी महाधमनी आक्रसणे (Coractation of Aorta)
५) स्टिरॉईड्स सारख्या अनेक औषधांचे दुष्परिणाम
कमी वयात उच्च रक्तदाब असणे हे आजारी किडणीचे लक्षण असू शकते.
किडणीच्या कोणत्या रोगांमुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो?
छोट्या मुलांतील उच्च रक्तदाबाला किडणीतील सूज, (अक्यूट ग्लोमेरुलोनेफ्रायटीस) क्रॉनिक ग्लोमेरुलोनेफ्रायटीस आणि जन्मतःच खराब मूत्रमार्ग असणे (Vesico Ureteric Reflux) ही कारणे जबाबदार असतात.
प्रौढ वयात उच्च रक्तदाब होण्याला मधुमेहामुळे किडणीचे होणारे नुकसान (डायबिटिक नेफ्रोपॅथी) क्रॉनिक ग्लोमेरुलोनेफ्रायटीस, पॉलिसिस्टिक किडणी डिसीझ, किडणीत रक्तपुरवठा करणारी धमनी आक्रसणे, ही कारणे मुख्यतः जबाबदार असतात.
कुठल्या परिस्थितीत किडणीमुळे रक्तदाब उच्च होण्याची शक्यता असते.
किडणीच्या कारणांमुळे रक्तदाब उच्च होण्याची शक्यता पुढील लक्षणांत अधिक असते.
१) तीस वर्षांपेक्षा कमी वयात उच्च रक्तदाब असणे
२) उच्च रक्तदाबाचे निदान होण्याच्या वेळी रक्तदाब २००/१२० पेक्षा अधिक, एवढा प्रचंड असणे
३) रक्तदाब खूप उच्च असणे व औषधे घेऊनही तो नियंत्रणात न येणे
४) रक्तदाबामुळे डोळ्याच्या पडद्यावर परिणाम होणे व कमी दिसणे
५) उच्च रक्तदाबाबरोबरच सकाळच्या वेळी चेहऱ्यावर सूज, अशक्त पणा, जेवणावरची वासना उडणे असे त्रास किडणी रोग असल्याचे संकेत देतात.
उच्च रक्तदाब असलेल्या रोग्यांत किडणीच्या आजारांचे निदान कशा प्रकारे होते?
सर्वसाधारणपणे लघवीची तपासणी, रक्तातील क्रिएटिनिनची तपासणी, पोटाचा एक्सरे आणि किडणीची सोनोग्राफीद्वारे तपासणी केल्याने बहुतेक किडणी रोगांबाबत प्राथमिक निदान होऊ शकते. ह्या तपासण्यांनंतर इंट्राव्हिनस पायलोग्राफी, कलर डॉपलर स्टडी आणि रेनल अँजिओग्राफी आदि तपासण्यांमधील आवश्यक असतील त्या तपासण्या केल्या जातात. अशा तन्हेने कुठल्या कारणांमुळे उच्च रक्तदाब आहे हे निश्चित केले जाते आणि त्यानुसार उपचार ठरवले जातात.
किडणी रोगांच्या प्राथमिक निदानासाठी लघवी, रक्तातील क्रिअॅटिनिन आणि सोनोग्राफीद्वारे तपासणी केली पाहिजे.
उच्च रक्तदाबाला जबाबदार असणाऱ्या किडणी रोगांचे निदान होणे का आवश्यक आहे?
किडणीच्या रोगांमुळेच रक्तदाब उच्च आहे ह्याचे त्वरित निदान होणे अत्यंत गरजेचे आहे. ह्याचे लाभ पुढीलप्रमाणे आहेत.
१) किडणीचे अनेक रोग त्वरित निदान आणि उपचारांनी ठीक होऊ शकतात.
२) कोणत्या प्रकारचा किडणी रोग झाला आहे हे लक्षात घेऊन योग्य आणि परिणामकारकरित्या उपचार करता येतात.
३) लहान मुलांच्या किडणीला जेव्हा सूज (अक्युट ग्लोमेरुलोनेफ्रायटिस) येते तेव्हा, त्वरित पण कमी वेळासाठी रक्तदाब वाढायला लागतो, ज्याचा मेंदूवर विपरीत परिणाम येतो व त्यामुळे संपूर्ण शरीराला ताठरता येऊ शकते व मूल बेशुद्ध पडू शकते. या उच्च रक्तदाबाचे योग्य वेळी निदान झाल्यास आणि उपचार केल्यास मुलांना या गंभीर त्रासापासून वाचवता येते.
४) उच्च रक्तदाब हा क्रॉनिक किडणी फेल्युअरसारख्या गंभीर रोगाचे सर्वात पहिले व एकमात्र लक्षण असू शकते. क्रॉनिक किडणी फेल्युअरमध्ये उच्च रक्तदाबावर योग्य नियंत्रण राखून आणि इतर उपचार करून किडणीचे संभाव्य नुकसान टाळता येते. तसेच क्रॉनिक किडणी फेल्युअरची गंभीर अवस्था, ज्यात डायलिसिसची गरज असते, ती बराच काळ लांबणीवर टाकता येते.
उपचार:
१) तात्कालिक वाढलेल्या रक्तदाबावरील उपचार:
मुख्यतः मुलांच्यात आढळणारा (अक्युट ग्लोमेरुलोनेफ्रायटिस) ह्या रोगात जेवणातले पातळ पदार्थ व मिठाचे प्रमाण कमी करणे, लघवीचे प्रमाण वाढवण्यासाठी औषधे घेणे व रक्तदाब कमी करण्याची औषधे घेण्यामुळे रक्तदाब हळूहळू कमी होऊन सामान्य होतो व त्यानंतर उपचारांची कोणतीही गरज भासत नाही.
किडणीच्या कारणामुळे होणाऱ्या उच्च रक्तदाबावरील उपचार आजाराच्या प्रकारांवर आधारित असतात.
औषध घेऊनही जर रक्तदाब अधिकच रहात असेल तर किडणीच्या रोगाबाबत तपासणी केली पाहिजे.
२) कायम राहणाऱ्या उच्च रक्तदाबावरील उपचार:
- क्रॉनिक किडणी फेल्युअर (Chronic Kidney Failure): या रोगामुळे निर्माण झालेल्या उच्चरक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी जेवणात मिठाचा कमी वापर करावा, शरीरावरील सूज लक्षात घेऊन वैद्यकीय सल्ल्यानुसार पाण्याचे प्रमाण कमी करावे आणि रक्तदाब कमी करण्याची योग्य औषधे घ्यावी. अशा प्रकारच्या रोगात उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवून त्यामुळे किडणीला होणारे नुकसान टाळता येते.
- रीनल आर्टरी स्टीनोसिस (Renal Artery Stenosis): किडणीचा रक्तपुरवठा करणारी धमनी आक्रसल्यामुळे रक्तदाब उच्च राहत असेल, तर त्वरित उपचार करून हा दाब कायमस्वरूपी नॉर्मल करता येतो. ह्या उपचारासाठी पुढील पर्याय उपलब्ध आहेत.
अ) रीनल अँजियोप्लास्टी (Renal Angioplasty)
या उपचारामध्ये शस्त्रक्रियेशिवाय कॅथेटरद्वारे धमनीच्या आक्रसलेल्या भागाला, कॅथेटरमध्ये असलेल्या फुग्याच्या मदतीने मोठे केले जाते. बहुतांश रोग्यात आक्रसलेला भाग पुन्हा मोठा केल्यानंतर तो परत आक्रसू नये म्हणून धमनीच्या आत स्टेंट ही विशेष प्रकारची पातळ नळी घातली जाते.
ब) शस्त्रक्रियेद्वारे उपचार (Auto Transplant)
या उपचारात शस्त्रक्रिया करून धमनीचा आक्रसलेला भाग बदलला जातो किंवा रोग्याची किडणी दुसऱ्या जागी असलेल्या धमनीशी जोडली जाते (किडणी प्रत्यारोपणाप्रमाणे).
क्रॉनिक किडणी फेल्युअरमध्ये उच्च रक्तदाबाचे योग्य नियंत्रण किडणीच्या सुरक्षेसाठी आवश्यक असते.