Read Online in Marathi
Table of Content
विवरण
प्राथमिक माहिती
किडणी फेल्योर
किडणी चे इतर मुख्य आजार
मुलांमबिल किडणीची आजार
किडणी आणि आहार

२६. मुलांनी रात्री अंवरूण ओले करणे

मूल जेव्हा छोटे असते तेव्हा रात्री त्याचे अंथरुण ओले होणे हे स्वाभाविक असते परंतु मुलाचे वय वाढल्यानंतरही रात्रीच्या वेळी अंथरुण ओले होत असेल, तर तो, मूल आणि त्याच्या आई वडिलांसाठी संकोच आणि चिंतेचा विषय बनतो. सुदैवाने बहुतेक मुलांच्यात ही समस्या किडणीच्या कुठल्यातरी रोगामुळे होताना दिसत नाही.

ही समस्या मुलांच्यात केव्हा जास्त आढळते?

  • ज्या मुलांच्या आई-वडिलांना त्यांच्या बालपणी हा त्रास झालेला असतो.
  • मुलींच्या तुलनेत मुलांच्यात ही समस्या तीन पट जास्त दिसून येते.
  • गाढ झोप लागणाऱ्या मुलांच्यात ही समस्या जास्त आढळते.
  • मानसिक तणावामुळे ही समस्या सुरू होते किंवा वाढताना दिसून येते.

ही समस्या किती मुलांच्यात दिसून येते? आणि ती केव्हा बरी होते?

  • ५ वर्षांहून अधिक वयाच्या १० ते १८% मुलांच्यात हा त्रास दिसून येतो.
  • साधारणपणे वय वाढण्याबरोबरच हा त्रास आपोआप कमी होत जातो आणि बराही होतो. मुलांच्यात दहाव्या वर्षी हा त्रास ३% तर १५ वर्षांहून अधिक वयात १% हूनही कमी दिसून येतो.
मुलांच्यात रात्री नकळत अंथरुण ओले होणे हा कोणताही आजार नाही.

रात्री अंथरुण ओले होणे केव्हा गंभीर मानले जाते?

  • दिवसाही अंथरुण ओले होत असेल तर.
  • शौचावर नियंत्रण राहत नसेल तर.
  • दिवसाही वारंवार लघवीला जावे लागत असेल तर.
  • लघवीची धार बारीक असेल किंवा लघवी थेंब थेंब होत असेल तर.

उपचार:

हा त्रास म्हणजे कुठलाही रोग नाही आणि मूल जाणूनबुजूनही अंथरुण ओले करत नाही. त्यामुळे मुलाला भीती दाखवणे किंवा त्याच्यावर ओरडणे सोडून दिले पाहिजे आणि ह्या समस्येवर सहानुभूतिपूर्वक उपचारांना सुरुवात केली पाहिजे.

१) समजावणे आणि प्रोत्साहन देणे:

मुलाला ह्या विषयाबाबतची माहिती देणे अत्यंत आवश्यक असते. रात्री नकळत अंथरुण ओले होणे ही चिंताजनक समस्या नाही आणि ती नक्की ठीक होईल, अशा प्रकारे मुलाला समजावल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि ह्या समस्येवर त्वरित उपाय करण्यासाठी मदत मिळते. ह्या समस्येवर चर्चा करून मुलाला भीती दाखवणे किंवा वाईटसाईट बोलणे टाळले पाहिजे. ज्या रात्री मूल अंथरुण ओले करणार नाही, त्या दिवशी मुलांच्या प्रयत्नांची प्रशंसा करणे आणि त्यासाठी छोटे मोठे बक्षीस देणे, ही समस्या सोडवायला मदतच करते.

२) द्रवपदार्थ पिणे आणि लघवीला जाण्याच्या सवयीत बदल:

संध्याकाळी ६ वाजल्यानंतर द्रवपदार्थ कमी प्रमाणात घेतले पाहिजेत आणि चहा कॉफीसारखी कॅफेन असलेली पेये संध्याकाळी घेता कामा नयेत.

वय वाढल्यानंतर सहानुभूती आणि प्रोत्साहन यातून ही समस्या सुटू शकते.

  • रात्री झोपण्यापूर्वी नेहमी लघवी करण्याची सवय लावली पाहिजे.
  • याशिवाय रात्री दोन-तीन वेळा मुलाला उठवून लघवी करायला लावली, तर तो अंथरुण ओले करणार नाही.
  • मुलाला डायपर घातल्यास रात्री अंथरुण ओले होणे वाचवता येते.

३) मूत्राशयाबाबतचे प्रशिक्षण:

  • बऱ्याच मुलांच्यात मूत्राशयात लघवी राहू शकते.
  • अशा मुलांना थोड्या-थोड्या वेळाने वारंवार लघवी करायला जावे लागते आणि रात्री अंथरुण ओले होते.
  • अशा मुलांना दिवसा लघवी लागल्यास ती रोखून धरणे, लघवी करताना थोडी लघवी झाल्यानंतर ती रोखणे ह्यासारख्या मूत्राशयाच्या व्यायामांबद्दल सल्ला दिला जातो. अशा प्रकारच्या व्यायामांमुळे मूत्राशय मजबूत होते आणि त्याची लघवी साठवण्याची क्षमता वाढते, तसेच लघवीवरील नियंत्रणही वाढते.

अलार्म सिस्टीम:

लघवी झाल्यावर आतील चड्डी ओली झाल्याबरोबर त्याला जोडलेली घंटा वाजू लागते, अशी पद्धत विकसित देशात उपलब्ध आहे. त्यामुळे लघवी होताच अलार्म सिस्टिमने दिलेल्या इशाऱ्यामुळे मूल लघवी रोखून धरते. अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे समस्येचा लवकर उपाय मिळतो. अशा प्रकारच्या उपकरणाचा उपयोग साधारणपणे सात वर्षांहून अधिक वयाच्या मुलांसाठी केला जातो.

संध्याकाळनंतर पाणी कमी पिणे, रात्री वेळेवर लघवी करून घेणे हे अंथरुण ओले करण्याच्या समस्येवरील महत्त्वपूर्ण उपचार आहेत.

औषधाद्वारे उपचार:

रात्री अंथरुण ओले होण्याच्या समस्येवर वापरल्या जाणाऱ्या औषधात इमिप्रेमिन आणि डेसमोप्रेसिनचा समावेश असतो. या औषधांचा उपयोग वरील सांगितलेल्या उपायांबरोबर केला जातो. इमिप्रेमिन ह्या औषधाचा उपयोग ७ वर्षाहून अधिक वयाच्या मुलांच्यातच केला जातो. हे औषध मूत्राशयाच्या स्नायूंना शिथिल बनवते, ज्यामुळे त्यात जास्त लघवी राहू शकते. याशिवाय हे औषध लघवी उतरू न देण्यासाठी जबाबदार असलेले स्नायू संकुचित करून लघवी होणे थांबवते. हे औषध डॉक्टरांच्या देखरेखीखाली ३ ते ६ महिन्यापर्यंत दिले जाते.

डेस्मोप्रेसिन (डि.डी.ए.वी.पी.) ह्या नावाचे औषध, स्प्रे तसेच गोळीच्या स्वरूपात बाजारात उपलब्ध आहे. ह्या औषधाच्या वापरामुळे रात्री लघवी कमी प्रमाणात तयार होते. ज्या मुलांच्यात रात्री जास्त प्रमाणात लघवी बनते, त्यांच्यासाठी हे औषध खूपच उपयोगी आहे. हे औषध रात्री अंथरुण ओले करणे थांबवण्यासाठीचे एक अचूक औषध आहे, परंतु हे औषध खूप महागडे असल्याने प्रत्येक मुलाचे आई-वडील हा खर्च उचलू शकत नाहीत.

रात्री अंथरुण ओले होण्याच्या समस्येत खूप कमी मुलांना औषधाची गरज पडते.