किडणीचे असे अनेक आजार आहेत, जे बरे होऊ शकत नाहीत. असे आजार जास्त दुर्धर झाल्यानंतर त्यांवर उपचार करणे खूप महागडे, खूप गुंतागुंतीचे आणि पूर्णपणे सुरक्षितही नसते. दुर्दैवाने किडणीच्या अनेक गंभीर आजारांमध्ये रोगाची प्रारंभिक लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे जेव्हा किडणीच्या आजाराबद्दल शंका वाटू लागले तेव्हा डॉक्टरना भेटून रोगाचे निदान आणि त्यावर उपचार केले पाहिजेत.
किडणीचा तपास कोणी केला पाहिजे? किडणीचा त्रास होण्याची शक्यता केव्हा अधिक असते?
- ज्या व्यक्तीमध्ये किडणीच्या आजाराची लक्षणे दिसतात,
- ज्या व्यक्तीला मधुमेहाचा आजार आहे,
- उच्च रक्तदाब आहे,
- अनुवंशिक किडणीचा आजार आहे,
- खूप काळ वेदनाशामक औषधे घेतली असली तर,
- जन्मापासून मूत्रमार्ग खराब असेल तर.
किडणीच्या आजाराचे निदान करण्यासाठी पुढील तपास आवश्यक आहे.
१) मूत्राची तपासणी:
किडणीच्या आजाराचे निदान करणेसाठी लघवीचा तपास करणे आवश्यक आहे.
- मूत्रात पू आढळून येणे ही मूत्रमार्गात जंतुसंसर्ग झाल्याची खूण आहे.
- मूत्रात प्रोटीन आणि रक्तकण दिसून येणे हेही किडणीला सूज आल्याचे (ग्लोमेरुलोनेफ्राईटीस) लक्षण आहे.
मूत्राची तपासणी किडणीच्या आजाराच्या प्राथमिक निदानासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे.
- किडणीच्या अनेक रोगांमध्ये लघवीद्वारे प्रथिने जाऊ लागतात. लघवीमधून प्रथिनांचे जाणे हे किडणीची कार्यक्षमता कमी होण्यासारख्या गंभीर आजाराचे प्राथमिक लक्षण असू शकते. मधुमेहामुळे किडणीची कार्यक्षमता कमी होण्याचे प्रारंभिक लक्षण हे लघवी मध्ये प्रथिने दिसू लागणे हेच असते.
- मायक्रोअल्ब्यूमिन्यूरिया: मधुमेहामुळे किडणीवर झालेल्या वाईट परिणामांचे सर्वात लवकर आणि योग्य वेळी निदान होण्यासाठी लघवीची तपासणी अत्यावश्यक आहे.
- लघवीच्या इतर तपासण्या या प्रकारे आहेत.
लघवीत क्षयरोगाच्या (T.B.) जीवाणूंची तपासणी (मूत्रमार्गाच्या क्षयरोगाच्या निदानासाठी)
२४ तासांच्या लघवीतील प्रथिनांचे प्रमाण (किडणीच्या सूज आणि त्यावरील उपचारांचा परिणाम जाणून घेण्यासाठी)
लघवीचे कल्चर आणि संवेदनशीलता तपासणी (लघवीत संक्रमणाला जबाबदार असणाऱ्या जीवाणूंचे निदान होण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी परिणामकारक औषधांची माहिती होण्यासाठी)
लघवीच्या तपासातून किडणीच्या विविध रोगांबाबत माहिती प्राप्त होते. मात्र लघवीचा अहवाल सर्वसामान्य आला तरी किडणीला कोणताही रोग झालेला नाही, असे ठामपणे म्हणता येणार नाही.
२) रक्ताची तपासणी:
- रक्तातले हिमोग्लोबिनचे प्रमाण: रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असणे; ज्याला आपण रक्ताल्पता (अँनिमिया) म्हणतो, हे किडणी पूर्ण क्षमतेने कार्य करत नसल्याची महत्त्वाची खूण आहे.
मात्र रक्ताची कमतरता ही इतर काही आजारांमुळेही असू शकते. त्यामुळे या चाचणीत नेहमी किडणीच्या रोगांविषयी माहिती मिळेलच असे नाही.
किडणीची कार्यक्षमता माहिती करण्यासाठी रक्तातील युरिया आणि क्रिएटिनिनची तपासणी करावी.
- रक्तात क्रिएटिनिन आणि युरियाचे प्रमाण: ही चाचणी किडणीच्या कार्यक्षमतेविषयी माहिती देते. क्रिएटिनिन आणि युरिया हा शरीरातला अनावश्यक कचरा आहे, जो किडणीद्वारे शरीरातून बाहेर टाकला जातो. रक्तात क्रिएटिनिनचे सामान्य प्रमाण ०.६ ते १.४ मिलिग्रॅम टक्के असते आणि दोन्ही किडण्यां खराब झाल्यावर यात वाढ होते. ही चाचणी किडणी निकामी झाल्याच्या निदानासाठी आणि उपचारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
- रक्ताच्या इतर चाचण्या: किडणीच्या वेगवेगळ्या रोगांचे निदान होण्यासाठी रक्ताच्या अन्य चाचण्या, ज्यात कोलेस्ट्रॉल, सोडियम, पोटॅशिअम, क्लोराईड, कॅल्शियम, फॉस्फरस, ए. एस. ओ. टाइटर, कम्प्लिमेन्ट आदींचा समावेश आहे.
३) रेडिओलॉजिकल चाचण्या:
- किडणीची सोनोग्राफी: ही सोपी, सुरक्षित आणि चटकन होणारी तपासणी आहे. यातून किडणीचा आकार, रचना, ठिकाण, मूत्रमार्गातला अडथळा, मुतखडा किंवा गाठ होणे याबाबत महत्त्वाची माहिती मिळते. खास करून हळूहळू किडणी निकामी होत असलेल्या रोग्यांमध्ये सोनोग्राफीत दोन्ही किडण्या आकुंचन पावलेल्या दिसून येतात.
- पोटाचा एक्सरे ही तपासणी विशेषत: मुतखड्याच्या निदानासाठी केली जाते.
किडणीची सोनोग्राफी तपासणी किडणी रोग तज्ञासाठी तिसऱ्या नेत्रासारखी असते.
- इन्ट्राविनस पायलोग्राफी (I.V.P.)
या तपासणीत रोग्याला एका विशेष प्रकारच्या आयोडीनयुक्त (रेडिओ कॉन्ट्रास्ट पदार्थ) औषधाचे इंजेक्शन दिले जाते. इंजेक्शन दिल्यानंतर थोड्या थोड्या फरकाने पोटाचा एक्सरे काढला जातो. पोटाच्या या एक्सरेत औषध किडणीतून मूत्रमार्गाद्वारे मूत्राशयात जातांना दिसून येते.
आय. व्ही. पी. किडणीची कार्यक्षमता आणि मूत्रमार्गाच्या रचनेबद्दल माहिती देते. ही तपासणी खास करून किडणीतले मुतखडे, मूत्रमार्गातले अडथळे किंवा गाठ यासारख्या आजारांवरील निदानासाठी केली जाते. जेव्हा किडणी खराब झाल्यामुळे किडणीची कार्यक्षमता कमी झाली असेल, तेव्हा चा तपासणीचा उपयोग होत नाही. रेडिओ कॉन्ट्रास्ट इंजेक्शन खराब किडणीचे आणखी नुकसान करू शकते, त्यामुळे हळूहळू किडणी निकामी होत असलेल्या रोग्यांसाठी ही तपासणी हानिकारक ठरू शकते.
आय. व्ही. पी. एक एक्सरे तपासणी असल्याकारणाने गर्भावस्थेत बाळासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे गर्भावस्थेत ही तपासणी केली जात नाही.
- इतर रेडियोलॉजिकल तपासण्या
काही विशेष प्रकारच्या रोगांच्या निदानासाठी किडणी डॉप्लर, मिक्चुरेटिंग सिस्टोयुरेथोग्राफ, रेडिओ न्यूक्लिअरस्टडी, रिनल अँन्जियोग्राफी, सी.टी. स्कॅन, ऍन्टीग्रेड अँड रिट्रोग्रेड पायलोग्राफी इत्यादी खास प्रकारच्या तपासण्या केल्या जातात.
४) इतर खास तपासण्या
किडणीची बायोप्सी, दुर्बिणीद्वारे मूत्रमार्गाची तपासणी आणि युरोडायनॅमिक्ससारख्या विशेष तपासण्या किडणीच्या रोगांचे योग्य निदान होण्यासाठी गरजेच्या आहेत.
- किडणीची बायोप्सी
किडणीची बायोप्सी पातळ सुईद्वारा, बेशुद्ध न करता केली जाणारी वेदनारहित तपासणी आहे. किडणीच्या अनेक रोगांचे कारण जाणून घेण्यासाठी किडणी बायोप्सी ही अत्यंत महत्त्वपूर्ण तपासणी आहे.
गर्भवती असतांना पोटाचा एक्सरे आणि I. V. P. तपासणी करू नये.
किडणी बायोप्सी काय आहे?
किडणीच्या अनेक रोगांचे कारण जाणून घेण्यासाठी सुईच्या मदतीने किडणीतून पातळ दोऱ्यासारखा तुकडा काढून त्याची विशिष्ट प्रकारची हिस्टोपॅथोलॉजिकल तपासणी करण्याला किडणी बायोप्सी म्हणतात.
किडणी बायोप्सीची गरज केव्हा पडते?
लघवीतून प्रथिने जाणे, किडणीची कार्यक्षमता कमी होणे या सारख्या किडणीच्या अनेक रोगांमध्ये काही रोग्यांच्या बाबतीत सर्व तपासण्या करूनही निश्चित निदान होत नसेल, तर अशा वेळी किडणी बायोप्सी आवश्यक असते.
किडणी बायोप्सी तपासणीचा फायदा कोणता?
या तपासणीद्वारे किडणीच्या रोगांचे निश्चित कारण जाणून घेऊन योग्य उपचार करता येतात. ही तपासणी कोणत्या प्रकारचे उपचार करायला हवेत, इलाज किती फायदेशीर ठरेल तसेच भविष्यात किडणी किती खराब होण्याची शक्यता आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती देते.
किडणीच्या अनेक रोगांचे निदान होण्यासाठी किडणी बायोप्सी ही अत्यावश्यक तपासणी आहे.
किडणी बायोप्सी कशा प्रकारे केली जाते?
किडणी बायोप्सीसाठी रोग्याला रुग्णालयात भरती केले जाते.
- ही तपासणी सुरक्षितरित्या व्हावी यासाठी रक्तदाब तसेच रक्तात गुठळी बनण्याची क्रिया सामान्य असली पाहिजे.
- रक्त पातळ करणारी अॅस्पिरिनसारखी औषधे बायोप्सी करण्यापूर्वी दोन आठवडे पूर्ण बंद करणे गरजेचे आहे.
- ही तपासणी रोग्याला बेशुद्ध न करता केली जाते, मात्र लहान मुलांची बायोप्सी बेशुद्ध करूनच केली जाते.
- बायोप्सीमध्ये रोग्याला पोटावर झोपवून पोटाखाली उशी ठेवली जाते.
- बायोप्सी करण्यासाठी सोनोग्राफीच्या पद्धतीने पाठीवर विशिष्ट जागा निश्चित केली जाते. पाठीत खाली कमरेच्या स्नायूजवळ बायोप्सीची योग्य जागा असते.
- या जागेला औषधाने साफ केल्यानंतर वेदनाशामक इंजेक्शन देऊन बधिर केले जाते.
- विशेष प्रकारच्या सुईच्या (बायोप्सी निडल) मदतीने किडणीतून पातळ धाग्यासारखे २ ते ३ तुकडे काढून ते हिस्टोपॅथोलॉजिकल तपासणीसाठी पॅथोलॉजिस्टकडे पाठवले जातात.
- बायोप्सी केल्यानंतर रोग्याला पलंगावर आराम करण्याचा सल्ला दिला जातो. बहुतेक रोग्यांना दुसऱ्या दिवशी घरी जाण्याची परवानगी दिली जाते.
- किडणी बायोप्सी केल्यानंतर रोग्याला २ ते ४ आठवडे मेहनतीचे काम न करण्याचा सल्ला दिला जातो. विशेषत: जड वस्तू न उचलण्याचा सल्ला दिला जातो.
बायोप्सी केवळ कर्करोगाच्या निदानासाठीच केली जाते, ही चुकीची समजूत आहे.