कुठल्याही व्यक्तीच्या शरीरात जर एकच किडणी असेल तर ती त्याच्यासाठी चिंतेची बाब ठरते. या विषयाबद्दल लोकांच्या मनात उपस्थित झालेल्या शंकांचे निवारण करत त्यांचा या विषयांसंबंधीचा गैरसमज दूर करण्याचा आणि योग्य मार्गदर्शन देण्याचा हा प्रयत्न!
एकच किडणी असलेल्या व्यक्तीला दैनंदिन जीवनात कुठला त्रास होतो व का?
एकच किडणी असलेल्या व्यक्तीला दैनंदिन जीवनात श्रम करण्यात कोणताही त्रास होत नाही. साधारणतः प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात दोन किडण्या असतात, परंतु प्रत्येक किडणी इतकी कार्यक्षम असते की ती एकटीच शरीराला आवश्यक असणारे काम पूर्ण करू शकते.
बहुतेकवेळा एक किडणी असणारी व्यक्ती आपले आयुष्य सर्वसामान्यपणे जगते. तिच्या शरीरात एक किडणी असल्याचे बहुतेक वेळा अचानक केलेल्या तपासणीत लक्षात येते.
एकच किडणी असण्याची कारणे कोणती?
एकच किडणी असण्याची कारणे पुढीलप्रमाणे:
१) जन्मजात शरीरात एकच किडणी असणे.
२) ऑपरेशनद्वारा शरीरातील एक किडणी काढून टाकलेली असणे, किडणीत मूत्रखडा होणे, सूज येणे किंवा दीर्घकाळ मूत्रमार्गात अडथळा निर्माण झाल्याकारणाने एका किडणीचे काम बंद होणे, तसेच किडणीत कर्करोगाची गाठ असणे.
३) किडणी प्रत्यारोपण झालेल्या रुणात नव्याने प्रत्यारोपित करण्यात आलेली एकच किडणी काम करत असते.
एकच किडणी असलेल्या व्यक्तीला दैनंदिन काम करण्यात आणि सामान्यपणे आयुष्य जगण्यात कुठलाही अडथळा येत नाही.
शरीरात जन्मजात एकच किडणी असण्याची शक्यता किती असते?
जन्मतःच शरीरात एकच किडणी असण्याची शक्यता स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त असते आणि अशी शक्यता साधारणतः साडेसातशे व्यक्तींमध्ये एकात असते.
एकच किडणी असलेल्या व्यक्तींना जागरुक का राहावे लागते?
सर्वसाधारणपणे एक किडणीवाल्या व्यक्तीला कुठलाही त्रास होत नाही, परंतु अशा व्यक्तीची तुलना राखीव चाक नसलेल्या गाडीशी केली जाते. रोग्याच्या काम करणाऱ्या एकमेव किडणीला जर काही कारणाने नुकसान पोहोचले तर दुसरी किडणी नसल्यामुळे शरीराचे काम पूर्णपणे थांबते. जर ही एकच असलेली किडणी थोड्याच काळात पूर्ववत काम करू शकली नाही, तर शरीरावर याचे अनेक विपरीत परिणाम होतात; जे हळूहळू प्राणघातक ठरू शकतात. अशा व्यक्तीला त्वरित डायलिसिस करण्याची गरज पडू शकते.
व्यक्तीच्या एकमात्र किडणीचे नुकसान होण्याची शक्यता कधी असते?
- एकमेव किडणीच्या मूत्रमार्गात मूत्रखड्यामुळे अडथळा येणे,
- पोटाच्या कोणत्याही शस्त्रक्रियेदरम्यान किडणीतून लघवी घेऊन जाणारी मूत्रवाहिनी चूकून बांधली गेली असताना,
- कुस्ती, बॉक्सिंग, कराटे, फूटबॉल, हॉकीसारख्या खेळांदरम्यान अचानक किडणीला धक्का लागल्यास.
बऱ्याच लोकांमध्ये जन्मतः एकच किडणी असते.
एक किडणी असणाऱ्या व्यक्तींनी कुठली काळजी घ्यायला पाहिजे
१) जास्त प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे.
२) किडणीला धक्का लागण्याची शक्यता असलेले खेळ टाळावेत.
३) लघवीतील जंतुसंसर्ग आणि मुतखडा झाल्यास त्वरित योग्य उपचार करावेत.
४) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये.
५) वर्षातून एकदा डॉक्टरांकडे जाऊन आपला रक्तदाब तपासावा व डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार रक्त व लघवीची तपासणी तसेच किडणीची सोनोग्राफी तपासणी करावी.
कोणत्याही प्रकाराचे उपचार घेण्याआधी किंवा शस्त्रक्रिया करण्यापूर्वी शरीरात एकच किडणी आहे, ह्याची माहिती डॉक्टरांना द्यावी.
एकच किडणी असणाऱ्या व्यक्तींनी चिंता करण्याचे कारण नसले तरी त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.