किडणीच्या रोगांपैकी क्रॉनिक किडणी फेल्युअर हा एक गंभीर रोग आहे. कारण सध्याच्या औषधोपचारात हा रोग पूर्णपणे नष्ट करण्याचे कोणतेही औषध उपलब्ध नाही. गेल्या अनेक वर्षांत ह्या रोगाच्या रुग्णांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढच होत आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, मुतखडा आदी रोगांची वाढती संख्या यासाठी प्रामुख्याने जबाबदार आहे.
क्रॉनिक किडणी फेल्युअर म्हणजे काय?
ह्या प्रकारच्या किडणी फेल्युअरमध्ये, किडणी खराब होण्याची प्रक्रिया खूप धीम्या गतीने होते; जी अनेक महिने वा वर्षे चालू शकते. दीर्घकाळानंतर रोग्याच्या दोन्ही किडण्या आकुंचन पावून एकदम छोट्या होतात आणि काम बंद करतात. कोणतेही औषध, ऑपरेशन किंवा डायलिसिस करूनही त्या ठीक होत नाहीत.
क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रोग्यावर सुरूवातीच्या काळात योग्य औषधे देऊन आणि खाण्यात पथ्य बाळगून उपचार करता येऊ शकतात.
एन्ड स्टेज किडणी (रिनल) डिसीज (ESKD/ESRD/CKD) काय आहे?
क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रोगात दोन्ही किडण्या हळूहळू खराब होऊ लागतात. जेव्हा किडणी ९०% हून अधिक खराब होते किंवा पूर्णपणे काम करणे बंद करते, तेव्हा त्याला एन्ड स्टेज रिनल डिसीज किंवा संपूर्ण किडणी फेल्युअर म्हटले जाते.
या अवस्थेत योग्य औषधे आणि पथ्य पाळूनही रोग्याची तब्बेत बिघडतच जाते आणि त्याला वाचवण्यासाठी नेहमी – नियमितपणे डायलिसिस करण्याची किंवा किडणी प्रत्यारोपण करण्याची गरज भासते.
क्रॉनिक किडणी फेल्युअरमध्ये किडणी हळूहळू, पुन्हा कधीच बरी होऊ शकणार नाही, अशा प्रकारे खराब होत जाते.
क्रॉनिक किडणी फेल्युअरची मुख्य कारणे काय?
वेगवेगळ्या प्रकारच्या उपचारानंतरही दोन्ही किडण्या ठीक न होऊ शकणाऱ्या या प्रकारच्या किडणी फेल्युअरची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे:
१) मधुमेह: क्रॉनिक किडणी फेल्युअरमध्ये ३० ते ४० टक्के रोगी; म्हणजेच दर तीन रोग्यांमधील एका रोग्याची किडणी मधुमेहामुळे खराब होते, हे जाणून आपल्याला वाईट वाटेल. मधुमेह हे क्रॉनिक किडणी फेल्युअरचे सर्वात गंभीर आणि महत्त्वाचे कारण आहे. यामुळेच मधुमेहाच्या प्रत्येक रोग्याने या रोगावर पूर्णपणे नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
२) उच्च रक्तदाब: दीर्घकाळ जर रक्तदाब उच्च राहिला तर, हा उच्च रक्तदाब क्रॉनिक किडणी फेल्युअरचे कारण होऊ शकतो.
३) क्रॉनिक ग्लोमेरूलोनेप्रायटीस: या प्रकारच्या किडणीच्या रोगात चेहरा आणि हातांवर सूज येते आणि दोन्ही किडण्या हळूहळू काम करणे बंद करतात.
४) अनुवंशिक रोग: पॉलिसिस्टी किडणी डिसीज.
५) मुतखड्याचा आजार: किडणी तसेच मूत्रमार्गात दोन्ही बाजूंनी मुतखड्यांमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांवर योग्यवेळी उपचार करण्यात निष्काळजीपणा.
६) वेदनाशामक औषधे, भस्म ह्यांसारखी दीर्घकाळ घेतलेली औषधे किडणीसाठी हानिकारक ठरू शकतात.
७) मुलांमध्ये वारंवार किडणी आणि मूत्रमार्गात संसर्ग होणे.
८) मुलांमध्ये जन्मत:च मूत्रमार्गात दोष असणे (Vesicoureteric Reflux, Posterior Urethral Valve) इत्यादी.
मधुमेह आणि उच्च रक्तदाब क्रॉनिक किडणी फेल्युअरची सर्वात महत्त्वपूर्ण कारणे आहेत.