Read Online in Marathi
Table of Content
विवरण
प्राथमिक माहिती
किडणी फेल्योर
किडणी चे इतर मुख्य आजार
मुलांमबिल किडणीची आजार
किडणी आणि आहार

१९. मूत्रमार्गतील जंतुसंसर्ग

किडणी, मूत्रवाहिनी, मूत्राशय आणि मूत्रनलिकांनी मूत्रमार्ग तयार होतो, ज्यात विषाणूंद्वारे होणाऱ्या संसर्गाला मूत्रमार्गाचा संसर्ग (Urinary Tract Infection किंवा UTI) म्हटले जाते.

मूत्रमार्ग संसर्गाची लक्षणे कोणती?

मूत्रमार्गाच्या वेगवेगळ्या भागात होणाऱ्या संसर्गाच्या परिणामांची लक्षणे ही वेगवेगळी असतात. संसर्गाच्या प्रमाणानुसार ही लक्षणे कमी-अधिक प्रमाणात दिसून येतात.

बहुतेक रोग्यांत दिसणारी लक्षणे:

  • लघवी करतांना जळजळ होणे वा दुखणे.
  • वारंवार लघवी लागणे आणि थेंब-थेंब लघवी होणे.

मूत्राशयातील संसर्गाची लक्षणे:

  • पोटाच्या खालच्या बाजूला दुखणे.
  • लाल रंगाची लघवी होणे.

किडणीच्या संसर्गाची लक्षणे:

  • थंडी वाजून ताप येणे.
  • कंबर दुखणे आणि अशक्तपणा जाणवणे.
  • जर योग्य उपचार केले नाहीत तर हा संसर्ग जीवघेणा ठरू शकतो.
जळजळीसह वारंवार लघवी होणे हे मूत्रमार्गाच्या संसर्गाचे लक्षण आहे.

मूत्रमार्गात वारंवार संसर्ग होण्याची कारणे कोणती?

मूत्रमार्गात वारंवार संसर्ग होण्याची आणि योग्य उपचारानंतरही संसर्ग नियंत्रणात न येण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

१) स्त्रियांची मूत्रनलिका लहान असल्याने मूत्राशयात लवकर संसर्ग होऊ शकतो.

२) मधुमेहात रक्त आणि लघवीत साखर (ग्लुकोज) चे प्रमाण जास्त होणे.

३) अनेक प्रौढ पुरुषांच्यात प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे आणि प्रौढ महिलात मूत्रनलिका आक्रसल्यामुळे लघवी करायला त्रास होतो आणि मूत्राशय पूर्ण रिकामे होत नाही.

४) मूत्रमार्गात मुतखड्याचा त्रास.

५) मूत्रमार्गात अडथळा : मूत्रनलिका आक्रसली असेल (Stricture Urethra) किंवा किडणी आणि मूत्रवाहिनीच्या मधील भाग आक्रसला (Pelvi Ureteric Junction Obstruction) असेल.

६) इतर कारणे : मूत्राशयाचे काम सामान्यपणे सुरू राहण्यात आलेल्या त्रुटी (Neurogenic Bladder), जन्मतःच मूत्रमार्गाला नुकसान होणे, ज्यामुळे लघवी मूत्राशयातून मूत्रवाहिनीत उलटी परत जाणे (Vesico Ureteric Reflux), मूत्रमार्गावर क्षयरोगाचा (T.B.) परिणाम.

मूत्रमार्गात वारंवार संसर्ग झाल्यास किडणीचे काही नुकसान होऊ शकते का?

सामान्यपणे लहान वयानंतर मूत्रमार्गात वारंवार संसर्ग होऊनही किडणीचे नुकसान होत नाही. परंतु मूत्रमार्गात खडा, अडथळा किंवा क्षयाची लागण झाली असेल तर मूत्रमार्गातल्या संसर्गामुळे किडणी खराब होण्याची भीती असते.

मुलांच्यात होणाऱ्या मूत्रमार्गाच्या संसर्गावर योग्यवेळी उपचार केले नाहीत, तर किडणीचे पुन्हा भरून न येणारे नुकसान होऊ शकते. त्यामुळे मूत्रमार्गसंसर्गाची समस्या इतर वयांपेक्षा मुलांच्यात जास्त गंभीर असते.

मूत्रमार्गातला अडथळा हे लघवीत वारंवार संसर्ग होण्याचे मुख्य कारण आहे.

मूत्रमार्ग संसर्गाचे निदान:

  • लघवीची सर्वसामान्य तपासणी: मायक्रोस्कोपद्वारा केल्या जाणाऱ्या लघवीच्या तपासणीत 'पू' आढळून येणे हे मूत्रमार्ग संसर्गाचे लक्षण आहे.
  • लघवीची: कल्चर आणि सेन्सिटिव्हिटीची तपासणी: लघवीची कल्चर आणि सेन्सिटिव्हिटीची तपासणी संसर्गाला जबाबदार असणाऱ्या विषाणूंचा प्रकार आणि त्यावरील उपचारासाठी परिणामकारक औषधांबद्दल पूर्ण माहिती देते.
  • इतर तपासण्या: रक्ताच्या तपासणीत रक्तातील पांढऱ्या पेशींचे अधिक प्रमाण संसर्गाचे गांभीर्य दर्शविते.

मूत्रमार्गात वारंवार संसर्ग होण्याच्या कारणांचे निदान कशाप्रकारे केले जाते?

लघवीत वारंवार पू होणे आणि संसर्गावरील उपचार लागू न पडल्यामागची कारणे जाणून घेण्यासाठी पुढील तपासण्या केल्या जातात.

१) पोटाचा एक्स-रे आणि सोनोग्राफी.

२) इन्ट्राव्हिनस पायलोग्राफी (IVP).

३) मिच्युरेटिंग सिस्टोयुरेथ्रोग्राम (MCU).

४) लघवीत क्षयरोगाच्या जीवाणूंविषयीची तपासणी (Urinary AFB).

५) युरॉलॉजिस्टद्वारा विशेष प्रकारच्या दूर्बिणीतून मूत्रनलिका आणि मूत्राशयाच्या आतील भागाची तपासणी (Cystoscopy).

६) स्त्रीरोगतज्ञांद्वारे तपासणी आणि निदान

मूत्रमार्ग संसर्गावरील परिणामकारक उपचारांसाठी लघवीची कल्चर तपासणी महत्त्वपूर्ण असते.

मूत्रमार्गाच्या संसर्गावरील उपचार:

१) जास्त पाणी पिणे:

लघवीत संसर्ग झालेल्या रोग्यांना जास्त प्रमाणात पाणी पिण्याचा विशेष सल्ला दिला जातो. किडणीत संसर्ग झाल्यामुळे काही रोग्यांना खूप उलट्या होतात. त्यांना रुग्णालयात भरती करून ग्लुकोज चढवण्याची गरज ही भासते.

२) औषधांद्वारे उपचार:

मूत्राशय संसर्गाचा त्रास होणाऱ्या रोग्यांवर सामान्यतः कोट्राइमेक्सेझॉल, सिफेलोस्पोरीन आणि क्वीनालोन्स गटातील औषधांद्वारे उपचार केले जातात. ही औषधे सामान्यतः ७ दिवसांसाठी दिली जातात. ज्या रोग्यात किडणीचा संसर्ग खूप गंभीर (अक्युट पायलोनेफ्रायटीस) असतो, त्यांना सुरुवातीला इंजेक्शनद्वारा अँटीबायोटिक्स दिली जातात.

साधारणपणे सिफेलोस्पोरिन्स, क्विनोलोन्स, अमिनोग्लायकोस्लाईड्स गटांच्या इंजेक्शनांद्वारे हे उपचार केले जातात. लघवीच्या कल्चर रिपोर्टच्या मदतीने अधिक परिणामकारक औषधे आणि इंजेक्शनांची निवड केली जाते. तब्बेत सुधारली तरीदेखील हे उपचार १४ दिवसांपर्यंत केले जातात.

उपचारानंतर केलेल्या लघवीच्या तपासणीत उपचारांचा किती फायदा झाला याबद्दलची माहिती मिळते. औषधोपचार पूर्ण झाल्यानंतर लघवीत 'पू' न आढळणे संसर्गावरील नियंत्रण दर्शविते.

मूत्रमार्ग संसर्गात अधिक पाणी पिणे गरजेचे असते.

३) मूत्रमार्ग संसर्गाच्या कारणांवरील उपचार:

आवश्यक तपासण्यांच्या मदतीने मूत्रमार्गातल्या कुठल्या समस्येमुळे वारंवार संसर्ग होत आहे किंवा उपचारांचा फायदा का होत नाही, याचे निदान करता येते. हे निदान लक्षात घेऊन औषधांत आवश्यक ते बदल आणि काही रोग्यांचे ऑपरेशनही केले जाते.

मूत्रमार्गाचा क्षयरोग:

क्षयरोग (टी.बी.) चा विविध अवयवांवर परिणाम होतो. त्यात किडणीवर परिणाम होणाऱ्या रोग्यांची संख्या ४ ते ८ टक्के असते. मूत्रमार्गात वारंवार संसर्ग होण्याचे एक कारण मूत्रमार्गाचा क्षयरोग ही असू शकते.

मूत्रमार्गातील क्षयाची लक्षणे:

  • हा रोग सामान्यपणे २५ ते ४० वयादरम्यान आणि महिलांच्या तुलनेत पुरुषांच्यात जास्त दिसून येतो.
  • २० ते ३० टक्के रोग्यांच्यात ह्या रोगाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र अन्य त्रासांबाबत केलेल्या तपासणीत अकस्मात ह्या रोगाचे निदान होते.
  • लघवीच्या वेळी जळजळ होणे, वारंवार लघवी होणे आणि सामान्य उपचारांचा फायदा न होणे.
  • लाल लघवी होणे.
  • केवळ १० ते २० टक्के रोग्यांमध्ये संध्याकाळी ताप येणे, थकायला होणे, वजन कमी होणे, भूक न लागणे वगैरे क्षयाची लक्षणे दिसून येतात.
  • मूत्रमार्गाच्या क्षयाच्या गंभीर परिणामांमुळे अधिक संसर्ग होणे, मुतखडा होणे, रक्तदाब वाढणे आणि मूत्रमार्गातील अडथळ्यांमुळे किडणी फुगून खराब होणे वगैरे त्रास होऊ शकतात.
मूत्रमार्ग संसर्गावरील यशस्वी उपचारांसाठी वारंवार संसर्ग होण्याची कारणे जाणून घेणे गरजेचे असते.

मूत्रमार्ग क्षयाचे निदान:

१) लघवीची तपासणी:

अ) ही सगळ्यात महत्त्वपूर्ण तपासणी आहे. लघवीत पू आणि रक्तकण दिसणे आणि लघवी अॅसिडिक होणे.

ब) विशेष प्रकारची सविस्तर चाचणी केल्यानंतर लघवीत क्षयाचे जीवाणू (Urinary AFB) दिसून येणे.

क) लघवीच्या कल्चरच्या तपासणीत कोणतेही जीवाणू न दिसणे. (Negative Urine Culture)

२) सोनोग्राफी:

सुरुवातीला या तपासणीतून कोणतीही माहिती मिळत नाही. अनेकवेळा क्षयाच्या प्रतिकूल परिणामांमुळे किडणी फुगलेली किंवा आकुंचित झालेली दिसून येते.

३) आय. व्ही. पी.:

अत्यंत उपयुक्त असणाऱ्या ह्या चाचणीत मूत्रवाहिनी आकुंचित झालेली दिसते. तसेच किडणीच्या आकारात झालेले परिवर्तन (फुगलेली / आक्रसलेली) किंवा मूत्राशय आक्रसणे ह्यांसारखे त्रास दिसून येतात.

४) इतर तपासण्या:

अनेक रोग्यांत मूत्रनलिका आणि मूत्राशयाची दूर्बिणीद्वारे तपासणी (सिस्टोस्कोपी) आणि बायोप्सीची खूप मदत मिळते.

मूत्रमार्गाचा क्षय लघवीत वारंवार संसर्ग होण्याचे एक महत्त्वपूर्ण कारण आहे.

मूत्रमार्ग क्षयावरील उपचार:

१) औषधे:

मूत्रमार्ग क्षयावर फुफ्फुसाच्या क्षयरोगासाठी दिली जाणारी औषधेच दिली जातात. सुरुवातीच्या दोन महिन्यात चार प्रकारची आणि त्यानंतर तीन प्रकारची औषधे दिली जातात.

२) इतर उपचार:

मूत्रमार्गाच्या क्षयामुळे जर मूत्रमार्गात अडथळा आला, तर त्यावर दूर्बिण अथवा ऑपरेशनद्वारा उपचार केले जातात. एखाद्या रोग्याची किडणी पूर्णपणे निकामी झाली असेल, तर अशी किडणी ऑपरेशनद्वारा काढून टाकली जाते.

लघवीतील क्षयाच्या जीवाणूंची तपासणी ही मूत्रमार्गाच्या क्षयाच्या निदानासाठी महत्त्वपूर्ण आहे.