अक्युट किडणी फेल्युअर म्हणजे काय?
संपूर्ण कार्यक्षमतेने कार्य करणाऱ्या दोन्ही किडण्या काही कारणाने अचानक नुकसान झाल्यामुळे थोड्या काळासाठी काम करणे कमी वा पूर्णपणे बंद करतात, तेव्हा त्याला आपण अँक्युट किडणी फेल्युअर म्हणतो.
अक्युट किडणी फेल्युअर होण्याची कारणे काय?
अक्युट किडणी फेल्युअर होण्याची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे:
- जास्त प्रमाणात जुलाब आणि उलटी झाल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे आणि रक्तदाब कमी होणे.
- शरीरात विषारी (फॅल्सीफेरम) मलेरिया होणे.
- G6PD ची कमतरता असणे. ह्या रोगात रक्तातील रक्तकण अनेक औषधे घेतल्यामुळे विघटित होऊ लागतात, ज्यामुळे किडणी अचानक निकामी होऊ शकते.
- मुतखड्यांमुळे मूत्रमार्गात अडथळे येणे.
याशिवाय, रक्तात गंभीर संसर्ग (Septicemia), किडणीत गंभीर संसर्ग, किडणीला विशिष्ट प्रकारची सूज, स्त्रियांच्यात प्रसूतीच्यावेळी अतिशय उच्च रक्तदाब असणे किंवा अधिक रक्तस्त्राव होणे, औषधांचा विपरीत परिणाम होणे, साप चावणे, स्नायूंवर पडलेल्या अधिक दाबांमुळे निर्माण झालेल्या विषारी पदार्थांचा गंभीर परिणाम किडणीवर होणे इत्यादी अक्युट किडणी फेल्युअरची कारणे आहेत.
अक्युट किडणी फेल्युअरमध्ये दोन्ही किडण्यांची कार्यक्षमता थोड्या काळासाठी म्हणजे व्हाही दिवसच कमी होते.
अक्युट किडणी फेल्युअरची लक्षणे:
या प्रकारच्या किडणी फेल्युअरमध्ये पूर्ण क्षमतेने कार्य करणारी किडणी अचानक खराब झाल्यामुळे या रोगाची लक्षणे अधिक प्रमाणात निर्माण होतात. ही लक्षणे वेगवेगळ्या रोग्यांमध्ये कमी वा जास्त प्रमाणात असू शकतात.
- कमी भूक लागणे, मळमळणे, उलटी होणे, उचकी लागणे
- लघवी कमी होणे वा बंद होणे
- चेहरा, पाय आणि शरीरावर सूज येणे, दम लागणे आणि रक्तदाब वाढणे.
- अशक्तपणा जाणवणे, झोप कमी होणे. स्मरणशक्ती कमी होणे, शरीर दुखणे आदी.
- रक्ताची उलटी होणे आणि रक्तात पोटॅशियमचे प्रमाण वाढणे. (ज्यामुळे अचानक हृदय बंद पडू शकते). किडणी फेल्युअरच्या या लक्षणांशिवाय, ज्या कारणांमुळे किडणी खराब झाली आहे, त्या रोगाची लक्षणेही दिसून येतात, जसे विषारी मलेरियात थंडी वाजून ताप येणे.
अक्युट किडणी फेल्युअरचे निदान:
जेव्हा कुठल्याही रोगामुळे किडणी खराब झाल्याची शंका असेल, तसेच रोग्यात दिसणाऱ्या लक्षणांमुळे किडणी फेल्युअरची शंका असेल, तेव्हा त्वरित रक्ताची चाचणी करून घेतली पाहिजे. रक्तातले क्रिएटिनिन आणि युरियाचे वाढलेले प्रमाण किडणी फेल्युअरचे संकेत असतात.
रक्त आणि लघवीची तपासणी, सोनोग्राफी वगैरेंच्या तपासातून अक्युट किडणी फेल्युअरचे निदान, त्याच्या कारणांचे निदान आणि त्यामुळे शरीरावर झालेल्या अन्य विपरीत परिणामांबाबत माहिती मिळू शकते.
अक्युट किडणी फेल्युअरमध्ये दोन्ही किडण्या अचानक खराब झाल्यामुळे रोगाची लक्षणे अधिक प्रमाणात दिसतात.
ऑक्युट किडणी फेल्युअर रोखण्याचे उपाय:
जुलाब, उलटी, मलेरियासारख्या किडणी खराब करणाऱ्या रोगांचे त्वरित निदान आणि उपचारांमुळे अक्युट किडणी फेल्युअर रोखले जाऊ शकते.
हा रोग झालेल्या रुग्णांनी
- रोगाच्या सुरुवातीला पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे.
- लघवी कमी होत असेल तर डॉक्टरांना त्याची त्वरित माहिती दिली पाहिजे आणि लघवीच्या प्रमाणातच पाणी प्यायले पाहिजे.
- असे कुठलेही औषध घेता कामा नये, ज्यामुळे किडणीचे नुकसान होऊ शकते (विशेष करून वेदनाशामक औषधे).
अक्युट किडणी फेल्युअरमध्ये किडणी किती काळानंतर पुन्हा काम वरू लागते?
योग्य उपचार घेतले तर केवळ एक ते चार आठवड्यात अधिकांश रोग्यांची किडणी पुन्हा पूर्णपणे काम करू लागते. अशा रोग्यांना इलाज पूर्णपणे झाल्यानंतर औषधे घेण्याची वा डायलिसिस करण्याची गरज भासत नाही.
अक्युट किडणी फेल्युअरवरील उपचार:
या रोगावरील उपचार, रोगाची कारणे, लक्षणांची तीव्रता आणि प्रयोगशाळेतील परीक्षण ध्यानात घेऊन वेगवेगळ्या रोग्यांमध्ये वेगवेगळे असतात. या रोगाच्या गंभीर स्वरूपात त्वरित उपचार केल्यास रोग्याला जणु पुनर्जन्मच मिळतो, मात्र उपचार न मिळाल्यास रोगी मृत्युमुखीही पडू शकतो.
या रोगात खराब झालेल्या दोन्ही किडण्या योग्य उपचारांमुळे पूर्णपणे ठीक होऊन पुन्हा कार्य करू लागतात.
अक्युट किडणी फेल्युअरचे मुख्य उपचार खालीलप्रमाणे आहेत:
१) किडणी खराब व्हायला कारणीभूत झालेल्या रोगांवर उपचार.
२) खाण्यापिण्यात पथ्य बाळगणे.
३) औषधांद्वारे उपचार.
४) डायलिसिस.
१) अक्युट किडणीला कारणीभूत असणाऱ्या रोगांवर उपचार:
- किडणी फेल्युअरची मुख्य कारणे उलटी, जुलाब किंवा फॅल्सीफेरम-मलेरिया असूशकतात. ही नियंत्रणात आणण्यासाठी त्वरित उपचार केले पाहिजेत. रक्तातील संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष प्रतिजैवके देऊन उपचार केले जातात. रक्तकण कमी झाले असतील तर रक्त दिले जाते.
- मुतखडा झाल्यामुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण झाला असेल तर दुर्बिणीद्वारे किंवा ऑपरेशनद्वारे हा अडथळा दूर केला जातो.
- त्वरित आणि योग्य उपचारांनी खराब झालेली किडणी अधिक खराब होण्यापासून वाचवता येते आणि किडणी पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्य करू शकते.
२) खाण्यातील पथ्य:
- किडणी काम करत नसेल तर; होणाऱ्या त्रासातील गुंतागुंत कमी करण्यासाठी आहारात पथ्य पाळणे गरजेचे आहे.
- लघवीचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी आणि अन्य द्रवपदार्थ कमी घेतले पाहिजेत. ज्यामुळे सूज आणि धाप लागण्याचा त्रास कमी होऊ शकतो.
- रक्तात पोटॅशिअमचे प्रमाण वाढू नये यासाठी, फळांचा रस, नारळ पाणी, सुका मेवा खाता कामा नये, जर रक्तातले पोटॅशियमचे प्रमाण वाढले तर त्याचा हृदयावर जीवघेणा परिणाम होऊ शकतो.
- मिठाचे प्रमाण कमी केल्यास: सूज, उच्च रक्तदाब, श्वास लागणे तसेच जास्त तहान लागणे यांसारख्या समस्या नियंत्रणात ठेवता येतात.
ह्या रोगात, योग्य औषधांद्वारा त्वरित उपचार केल्यास, बर्याचदा डायलिसिसशिवायही किडणी ठीक होऊ शकते.
३) औषधांद्वारे उपचार:
- लघवीचे प्रमाण वाढविण्याची औषधे: लघवी कमी झाल्यामुळे शरीरावर आलेली सूज, श्वास लागणे इत्यादी लक्षणे कमी करण्यास ही औषधे अतिशय उपयोगी ठरतात.
- उलटी आणि ऍसिडिटीची औषधे: किडणी फेल्युअरमुळे होणाऱ्या उलट्या, मळमळ, उचकी लागणे इत्यादी थांबवण्यासाठी ही औषधे उपयोगी ठरू शकतात.
- अन्य औषधे: धाप लागणे, रक्ताची उलटी होणे, वेदना होणे यांसारख्या गंभीर वेदनांपासून आराम देतात.
४) डायलिसिस:
डायलिसिस म्हणजे काय?
किडणी काम करीत नसल्यामुळे शरीरात जमा होणारे अनावश्यक पदार्थ, पाणी, क्षार आणि आम्लासारख्या रसायनांना कृत्रिम पद्धतीने दूर करून, रक्ताचे शुद्धीकरण करण्याच्या प्रक्रियेला डायलिसिस म्हणतात.
ह्या रोगात डायलिसिस करण्याला विलंब जीवघेणा, तर योग्यवेळी केलेले डायलिसिस जीवनदान ठरू शकते.
डायत्निसिसचे दोन प्रकार आहेत: पेरिटोनियल आणि हीमोडायलिसिस. डायलिसिसच्या संबंधात, तेराव्या प्रकरणात विस्तृत माहिती दिली आहे.
डायलिसिसची गरज केव्हा पडते?
अक्युट किडणी फेल्युअरच्या सर्व रोग्यांवर औषधे आणि खाण्यात पथ्य बाळगून उपचार केले जातात. पण जेव्हा, किडणीला अधिक नुकसान झालेले असते, तेव्हा सर्व उपचार करूनही रोगाची लक्षणे वाढत जातात, जी जीवघेणी ठरू शकतात. अशा काही रोगांसाठी डायलिसिस गरजेचे ठरते. योग्य वेळी डायलिसिसच्या उपचारांनी अशा रोग्यांना नवजीवन मिळू शकते.
डायलिसिस किती वेळा करावे लागते?
- जोपर्यंत रोग्याची खराब झालेली किडणी पुन्हा संतोषजनकरीत्या कार्य करू लागत नाही, तोपर्यंत डायलिसिस कृत्रिम रूपात किडणीचे णीचे करीत रोग्याची तब्बेत ठीक ठेवण्यात मदत करते.
- किडणीत सुधारणा व्हायला सामान्यत: १ ते ४ आठवडे लागू शकतात. ह्या काळात आवश्यकतेनुसार डायलिसिस करणे गरजेचे असते.
- एकदा डायलिसिस केल्यानंतर वारंवार डायलिसिस करावे लागते असा अनेक जणांचा गैरसमज असतो. कधीकधी ह्या भीतीमुळे रोगी उपचार करण्यात विलंब करतात, ज्यामुळे रोग बळावतो आणि त्यामुळे डॉक्टरांनी उपचार करण्यापूर्वीच रोगी शेवटचा श्वास घेतो.
- सर्व रोग्यांच्या औषधांमुळे तर काही रोग्यांच्या डायलिसिसच्या योग्य उपचारांमुळे काही दिवसात वा आठवड्यात दोन्ही किडण्या पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्य करू लागतात. नंतर रोगी पूर्ण बरे होतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारची औषधे घ्यायला लागत नाहीत वा पथ्यही पाळावे लागत नाही.
अक्युट किडणी फेल्युअरमध्ये डायलिसिसची आवश्यकता काही दिवसांसाठीच असते.