Read Online in Marathi
Table of Content
विवरण
प्राथमिक माहिती
किडणी फेल्योर
किडणी चे इतर मुख्य आजार
मुलांमबिल किडणीची आजार
किडणी आणि आहार

५. किडणीचे रोग

किडणीच्या रोगांचे दोन मुख्य भाग करता येतील

  • मेडिकल रोग (औषधांसंबंधी): या प्रकारच्या रोगांवर नेफ्रोलॉजिस्ट औषधांद्वारे उपचार करतात. किडणी फेल्युअर (निकामी होण्याच्या) च्या गंभीर रुग्णांवर डायलिसिस आणि किडणी प्रत्यारोपणाची सुद्धा गरज भासू शकते.
  • सर्जिकल रोग (ऑपरेशन संबंधी): या प्रकारच्या किडणी रोगांवर युरोलॉजिस्ट उपचार करतात. यात सर्वसामान्यपणे शस्त्रक्रिया, दुर्बिणीतून तपासणी (एन्डोस्कोपी) आणि लेसरद्वारे मुतखडे तोडणे (लिथोट्रिप्सी) यांचा समावेश असतो.
  • नेफ्रॉलॉजिस्ट आणि युरॉलॉजिस्ट यांच्यातला फरक कोणता? किडणीच्या तञ्ज्ञ डॉक्टर (फिजिशियन) ला नेफ्रॉलॉजिस्ट म्हणतात; जे औषधांद्वारे उपचार करतात आणि डायलिसिसद्वारा रक्त शुद्ध करतात. तर किडणीच्या तञ्ज्ञ सर्जनला युरॉलॉजिस्ट म्हणतात; जे साधारणपणे शस्त्रक्रिया आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून किडणीच्या रोगांचा इलाज करतात.
किडणीचे मुख्य रोग
मेडिकल रोग सर्जिकल रोग
किडणी फेल्युअर (निकामी होणे) मूत्रमार्गात खडे
किडणीला सूज येणे प्रोस्टेटचा आजार
नेफ्रॉटिक सिन्ड्रोम मूत्रमार्गात जन्मापासून त्रास
लघवीत संक्रमणाचा रोग मूत्रमार्गाचा कर्करोग

 

किडणीचे कार्य थोड्या काळाकरता बंद झाल्याने अचानक किडणी खराब होते, मात्र उपचारानंतर किडणी पूर्ण बरी होऊ शकते.

किडणी फेल्युअर

किडणी फेल्युअरचा अर्थ आहे, दोन्ही किडण्यांची कार्यक्षमता कमी होणे. रक्तात क्रिएटिनिन आणि युरियाचे वाढलेले प्रमाण किडणीची कार्यक्षमता कमी होण्याचे संकेत देतात.

किडणी फेल्युअर दोन प्रकारचे असते

१. अक्युट किडणी फेल्युअर

२. क्रॉनिक किडणी फेल्युअर

१. अक्युट किडणी फेल्युअर
अक्युट किडणी फेल्युअरमध्ये नीट काम करणारी किडणी थोड्या काळाकरता अचानक खराब होते. अक्युट किडणी फेल्युअर होण्याची प्रमुख लक्षणे उलटी-जुलाब होणे, मलेरिया, रक्तदाब अचानक कमी होणे ही आहेत, योग्य औषधे आणि डायलिसिससारखे उपचार याद्वारे अशा प्रकारे खराब झालेल्या दोन्ही किडण्या पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्य करू लागतात.

२. क्रॉनिक किडणी फेल्युअर
क्रॉनिक किडणी फेल्युअर (क्रॉनिक किडणी डिसिज CKD) मध्ये दोन्ही किडण्या हळूहळू दीर्घकाळ अशा रीतीने खराब होतात की, ज्या पुन्हा बऱ्या होऊ शकत नाहीत. शरीराला सूज येणे, भूक कमी होणे, उलटी होणे, घशाशी येणें, जीव घाबरा होणे, अशक्तपणा जाणवणे, कमी वयात उच्च रक्तदाब असणे आदी या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत. क्रॉनिक किडणी फेल्युअर होण्याची मुख्य कारणे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि किडणीचे वेगवेगळे आजार ही आहेत.

क्रॉनिक किडणी फेल्युअरमध्ये दोन्ही किडण्या हळूहळू अशा प्रकारे खराब होतात की पुन्हा नीट होऊ शकत नाहीत.

रक्ततपासणीमध्ये क्रिएटिनिन आणि युरियाच्या प्रमाणामुळे किडणीच्या कार्यक्षमतेबद्दल माहिती मिळते. किडणी जास्त खराब झाल्यास रक्तात क्रिएटिनिन आणि युरियाचे प्रमाण वाढू लागते.

या रोगावर औषधे आणि जेवणाखाण्यात पथ्ये पाळून प्राथमिक उपचार करता येतात. किडणी अधिक खराब होण्यापासून वाचवताना, रोग्याचे आरोग्य औषधांच्या मदतीने दीर्घकाळ टिकवणे हा या उपचाराचा उद्देश आहे.

किडणी अधिक खराब होत गेली आणि क्रिएटिनिनचे प्रमाण ८ ते १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढले तर औषधे आणि पथ्ये पाळूनही रोग्याची तब्बेत सुधारत नाही. अशा स्थितित डायलिसिस (रक्ताचे किंवा पोटाचे डायलिसिस) आणि किडणी प्रत्यारोपण हे उपचाराचे दोन पर्याय समोर असतात.

डायलिसिस

दोन्ही किडण्यांमध्ये जेव्हा अधिक बिघाड होतो तेव्हा शरीरात उत्सर्जित न होणाऱ्या अनावश्यक पदार्थांचे तसेच पाण्याचे प्रमाण खूप वाढते. हे पदार्थ कृत्रिमरित्या दूर करण्याच्या क्रियेला डायलिसिस असे म्हणतात.

हीमोडायलिसिस (रक्ताचे मशीनद्वारे शुद्धीकरण)

अशा प्रकारच्या डायलिसिसमध्ये हीमोडायलिसिस यंत्राच्या मदतीने कृत्रिम किडणीमध्ये रक्त शुद्ध केले जाते. ए व्ही फिस्चुला किंवा डबल ल्यूमेन कॅथेटरच्या मदतीने, शरीरातून शुद्ध करण्यासाठी रक्त काढले जाते. मशिनच्या मदतीने रक्त शुद्ध होऊन पुन्हा शरीरात परत पाठवले जाते.

किडणीत अधिक बिघाड झाल्यानंतर किडणीचे कार्य करणाऱ्या कृत्रिम उपचाराला डायलिसिस म्हणतात.

तब्बेत तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोग्याला आठवड्यात २/३ वेळा नियमितपणे हीमोडायलिसिस करणे गरजेचे असते. हीमोडायलिसिस करतेवेळी रोगी पलंगावर आराम करणे, नाश्ता करणे, T.V. पाहणे आणि नेहमीची कामे करू शकतो. नियमित डायलिसिस केले तर रोगी सर्वसामान्य जीवन जगू शकतो, फक्त हीमोडायलिसिस विभागात जावे लागते, तेथे चार तासात ही प्रक्रिया केली जाते.

सध्याच्या काळात हीमोडायलिसिस करावे लागणाऱ्या रुग्णांची संख्या पोटाचे डायलिसिस (CAPD ) कराव्या लागणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त आहे.

पेरीटोनियल डायलिसिस: पोटाचे डायलिसिस (CAPD)

या डायलिसिसमध्ये रोगी स्वतःच्या घरीच मशीनशिवाय डायलिसिस करू शकतो. CAPD मध्ये खास करून मऊ आणि अनेक छेद असलेली नळी (कॅथेटर) सामान्य शस्त्रक्रियेद्वारे पोटात घातली जाते. ह्या नळीद्वारे (P.D. Fluid) हा विशिष्ट द्रवपदार्थ पोटात घातला जातो. काही तासांनंतर जेव्हा हा द्रवपदार्थ त्याच नळीद्वारे बाहेर काढला जातो तेव्हा ह्या द्रवाबरोबर शरीरातील अनावश्यक कचरा बाहेर येतो. या क्रियेत हीमोडायलिसिसपेक्षा अधिक खर्च होतो तसेच पोटात संसर्ग होण्याचा धोका असतो. CAPD चे हे दोन मुख्य तोटे आहेत.

अक्यूट ग्लोमेरुलोनेफ्रायटिस्

कुठल्याही वयात होऊ शकणारा हा किडणीचा रोग लहान मुलांमध्ये जास्त दिसून येतो. हा रोग गळ्यातल्या जंतुसंसर्गामुळे किंवा त्वचेतल्या संसर्गामुळे होतो. चेहऱ्यावर सूज येणे, लघवीचा रंग लाल होणे ही या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत.

या रोगाच्या तपासादरम्यान उच्चरक्तदाब, लघवीत प्रथिने आणि रक्तकण आढळणे, तसेच अनेकवेळा किडणी निकामी होणे पाहायला मिळते. बहुतेक मुलांना त्वरित योग्य औषध दिले गेले तर थोड्याच काळात हा रोग पूर्णपणे बरा होतो

अक्यूट ग्लोमेरुलोनेफ्रायटिस हा मुलांमध्ये सर्वाधिक आढळून येणार किडणीचा आजार आहे.

नेफ्रोटिक सिंड्रोम

किडणीचा हा रोग इतर वयोगटांपेक्षा मुलांच्यात अधिक दिसून येतो. शरीरावर वारंवार सूज येणे हे या रोगाचे प्रमुख लक्षण आहे. या रोगात लघवीत प्रथिने आढळणे, रक्त तपासणीत प्रथिने कमी होणे आणि कोलेस्ट्रॉल वाढलेले दिसून येते. ह्या रोगात रक्तदाब वाढत नाही आणि किडणी खराब होण्याची शक्यता खूप कमी असते.

हा रोग औषधे घेऊन बरा होतो, परंतु वारंवार रोगाने डोके वर काढणे त्याबरोबरच शरीरावर सूज येणे ही नेफ्रोटिक सिंड्रोमची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच अनेक वर्षापर्यंत या रोगाचा उद्भव मुले तसेच त्यांच्या कुटुंबाच्या धैर्याची परीक्षा घेणारा असतो.

लघवीत जंतुसंसर्ग

लघवीच्या वेळी जळजळ होणे, वारंवार लघवीला जावे लागणे, दुखणे, ताप येणे आदी लघवीतल्या जंतुसंसर्गाची लक्षणे आहेत. लघवीच्या तपासणीत पू आढळून आल्यास ह्या रोगाचे निदान होते.

बहुतांशी हा रोग औषध घेतल्यावर बरा होतो. या रोगावरील उपचारांदरम्यान मुलांची विशेष देखभाल करणे आवश्यक असते. मुलांच्या लघवीतील संसर्गाच्या निदानात विलंब झाल्यास किंवा योग्य उपचार न झाल्यास किडणीला गंभीर नुकसान (जे बरे होऊ शकत नाही) पोहोचण्याची भीती असते.

जर लघवीत वारंवार संसर्ग होत असेल, तर रोग्याची, मूत्रमार्गात अडथळा निर्माण होण्याची, मुतखड्याची, मूत्रमार्गाच्या क्षयरोगाची चाचणी करणे गरजेचे असते. मुलांच्यात लघवीचा संसर्ग वारंवार होण्याचे मुख्य कारण आहे व्ही यू आर! व्ही यू आर (वसायको युरेटरीक रिफ्लेक्सेस) मध्ये मूत्राशय आणि मूत्रवाहिनीच्या मधल्या भागात असलेल्या झडपेत जन्मत:च इजा पोहचलेली असते. त्यामुळे लघवी मूत्राशयातून उलट मूत्रवाहिनीत आणि किडणीच्या दिशेने जाते.

अर्धवट तपासणी आणि विलंबाने उपचार यामुळे मुलांना लघवीद्वारे झालेल्या | संसर्गामुळे किडणीचे बरे न होऊ शकणारे नुकसान होऊ शकते.

मुतखड्याचा रोग

मुतखडा हा किडणीचा एक महत्त्वपूर्ण रोग आहे. सर्वसामान्यपणे मुतखडा किडणी, मूत्रवाहिनी आणि मूत्राशयात होणारा रोग आहे. पोटात असह्य वेदना होणे, उलटी आणि उमाळे येणे, लघवीचा रंग लाल होणे इ. या रोगाची मुख्य लक्षणे आहेत. या रोगात अनेक रुग्णांना मुतखडा असूनही वेदना होत नाहीत, अशा मुतखड्यांना 'सायलेंट स्टोन' म्हणतात.

पोटाचा एक्सरे आणि सोनोग्राफी मुतखड्याचे निदान करण्यासाठी सर्वात महत्त्वाची तपासणी आहे. छोटे मुतखडे अधिक पाणी प्यायल्यानंतर आपोआप नैसर्गिकरित्या निघून जातात.

जर मुतखड्यामुळे वारंवार अधिक वेदना होऊ लागल्या, लघवीतून वारंवार रक्त किंवा पू जाऊ लागला आणि मुतखड्यांमुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण झाला तर किडणीचे नुकसान होण्याची भीती असते. तेव्हा अशा रुग्णांचा मुतखडा बाहेर काढणे गरजेचे होते.

सर्वसामान्यपणे मुतखडा काढण्यासाठी प्रचलित असलेल्या पद्धतींमध्ये लिथोट्रिप्सी, दुर्बिणीद्वारे PCNL, सिस्टोस्कोपी आणि युरेटरोस्कोपी) उपचार आणि शस्त्रक्रियेद्वारे मुतखडा काढणे याचा समावेश आहे. ८० टक्के रुग्णांच्यात मुतखड्याचा त्रास पुन्हा होऊ शकतो.

त्यामुळे जास्त पाणी पिणे, जेवणात पथ्य पाळणे आणि वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आणि लाभदायक असते

मुतखडयाच्या रोगाचे मुख्य लक्षण पोटात दुखणे हे आहे.

प्रोस्टेटचा रोग (BPH)

प्रोस्टेट ग्रंथी या केवळ पुरुषांच्यातच असतात. मूत्राशयातून लघवी बाहेर काढणारी नळी अर्थात मूत्रनलिकेचा सुरूवातीचा भाग प्रोस्टेट ग्रंथीमधून जातो. अधिक वय झालेल्या पुरुषांच्या प्रोस्टेटचा आकार वाढल्यामुळे मूत्रनलिकेवर दबाव येतो आणि रोग्याला लघवी करताना त्रास होतो. यालाच BPH अर्थात बिनाइन प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी म्हणतात. रात्री अनेकवेळा लघवीसाठी उठणे लघवीची धार पातळ असणे, जोर केल्यावरच लघवी होणे ही BPH ची लक्षणे आहेत. प्राथमिक अवस्थेत यावर औषधांद्वारे उपचार करता येतो. जर औषधोपचारानंतरही सुधारणा झाली नाही तर दुर्बिणीद्वारे (टीयूआरपी) उपचार करणे गरजेचे ठरते.

वय वाढलेल्या पुरुषांना लघवीच्या वेळी होणाऱ्या त्रासाचे मुख्य कारण BPH असते.